जाणिवजनक - भाग 8
मानवी भाषेने स्वर आणि व्यंजन स्विकारण्याबाबतचे अचूक निर्णय कोणत्या नैसर्गिक
नियमांवर आधारलेले असावेत? मराठीने त्यांचे पालन केले आहे का? या मागील लेखातील
प्रश्नाच्या उत्तराचा पुढील भाग.
मागील लेखात आपण ‘उच्चार’ या विभागातील ‘शाश्वत-गृहीत-1 = भाषेत वापरले जाणारे
उच्चार, ‘वेदना न देणार्या’ व ‘सर्वाना सहजतेने मुखातून निर्माण करता येणार्या’,
ध्वनीच्या गुणधर्मांवर आधारीत असावेत’ याबाबत मराठीने स्विकारलेला पुढील भाग
बघीतला.
तरतुद-1.1 = लहान-मोठेपणा या ध्वनी गुणधर्मावर मराठीने भाषीक-अर्थ अवलंबून
ठेवलेला नाही.
तरतुद-1.2 = उच्च-नीचता या ध्वनी गुणधर्मावर मराठीने भाषीक-अर्थ अवलंबून
ठेवलेला नाही.
आता आपण चर्चा पुढे नेऊ.
तरतुद-1.3 = भाषेतून सहजपणे वापरता येतील आणि ऐकून ज्याची समान जाणीव सर्वांना
होईल, अशा उच्चारीत ध्वनींच्या मानवाला होणार्या नैसर्गिक जाणीवांना मराठीने
स्विकारले आहे.
तुम्ही ‘ए’ स्वर अंदाजे पाच, दहा, वीस, तीस वा श्वास टिकेपर्यंत लांब उच्चारा.
प्रत्येक उच्चाराला सुरवात, शेवट आणि त्यामधला काळ असतो. या संपूर्ण उच्चारात
तुम्हाला ‘ए’ हा स्वर सुरवातीपासून शेवटपर्यंत अखंडीतपणे एकाच ध्वनीचा, नादाचा,
आवाजाचा असल्याचे लक्षात येते. म्हणजे यात दोन ध्वनी नसल्याचे कोणत्याही मानवाला
ऐकून उमगते.
मराठीत ‘अ, आ, इ, उ, ओ, ए, अॅ, ऑ’ हे आठ मूलभूत-स्वर आहेत. तसेच मराठीतील
ओघवत्या-स्वरांचे दोन गट आहेत, 1) र्हस्व-स्वरांना दिलेला दीर्घ-स्वर-दर्जा. यात
‘ई’ व ‘ऊ’ हे दोन स्वर मोडतात. 2) संयुक्त-स्वर यात ‘ऐ=अ+इ’ आणि ‘औ=अ+उ’ असे दोन
स्वर मोडतात. ‘कैलास’ शब्दाच्या उच्चारातील ‘कै’ चा उच्चार ‘क्+अ+इ’ असा होतो,
‘क्+आ+इ’ होत नाही.
तसेच ‘कौलारू’ शब्दाच्या उच्चारातील ‘कौ’ चा उच्चार ‘क्+अ+उ’ असा होतो,
‘क्+आ+उ’ होत नाही.
‘कै’ आणि ‘कौ’ यातील ‘ऐ’ आणि ‘औ’ हे स्वर श्वास टिकेपर्यंत वाढवताना त्यात शेवटी
येणार्या अनुक्रमे ‘इ’ आणि ‘उ’ स्वरांचाच उच्चार लांबवता येतो. ‘ऐ’ आणि ‘औ’ या
संयुक्त-स्वरांतील प्रथम येणारा ‘अ’ स्वर केवळ क्षणभर टिकतो, तो वाढवता येत नाही.
कोणत्याही मानवाने ‘कैलास’ वा ‘कौलारू’ हे मराठी शब्द उच्चारले तरी हेच घडते इतके
हे सर्वांना सहज जमेल असे आणि नैसर्गिक ठरते.
आता आपण याचे अधिक स्पष्टीकरण पाहू. मराठीने ‘ए’ स्वराला ‘मूलभूत-स्वर’ म्हणून
भाषेत स्विकारले आहे. आजच्या मराठीच्या पुस्तकी व्याकरणात मात्र ‘ए’ स्वराचा
उल्लेख ‘ए हा स्वर दोन स्वर एकत्र येऊन बनलेला आढळेल’ असे दिले आहे. याचे कारण
मराठी व्याकरणकारांनी पाणिनींच्या संस्कृत-व्याकरणाची तंतोतंत नक्कल करण्यात
आत्मसन्मान समजला.
संस्कृतच्या व्याकरणाने नैसर्गिकपणे मानवाला ऐकू येणार्या जाणीवेशी प्रतारणा
केलेली आढळते. कोणत्याही मानवाला स्वरामधल्या अखंडीतपणे ऐकू येणार्या गुणधर्माला
त्याज्य मानून संस्कृतचे भाषीक नियम बनवले गेले. संस्कृतने ‘ए, ओ, ऐ, औ’ या चार
स्वरांना संयुक्त मानले आहे. यातील ‘मानले आहे’ हा भाग महत्त्वाचा ठरतो. त्याचे
संस्कृतने दिलेले विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
ए = (अ
किंवा आ + इ
किंवा ई), ओ = (अ किंवा आ + उ किंवा ऊ),
ऐ = (अ
किंवा आ + ए
किंवा ऐ), औ = (अ किंवा आ + ओ किंवा औ).
याचे कारण व्याकरणकार माननीय पाणिनीं यांनी भाषेच्या स्वाभाविक नैसर्गिकपणापेक्षा
‘संस्कृत भाषेला बदलण्याची संधीच प्राप्त होऊ नये, जेणे करून संस्कृतमधील
वेद-उपनिषदे अशा असामान्य साहित्याचा वारसा कायमस्वरूपी पिढ्यान् पिढ्या
सर्वांपर्यंत पोचावा’, यासाठी संस्कृतचे व्याकरण वेद-उपनिषदे यांच्या निर्मितीनंतर
अंदाजे एक हजार वर्षांनी (म्हणजे अंदाजे अडीच हजार वर्षांपुर्वी) निर्माण केले.
वेद-उपनिषदे यांच्या काळात म्हणजे अंदाजे साडेतीन हजार वर्षांपुर्वी अस्तित्वात
असलेले संस्कृत व्याकरण कसे होते?, याबाबत इतिहासातून कोणतीही अचूक माहिती मिळत
नाही. पण त्यावेळचे संस्कृत व्याकरण नक्कीच भिन्न होते याच्या खुणा मात्र पुरावा
म्हणून मिळतात. उदाहरण - वेद-उपनिषदे यांच्याकाळात संस्कृत मध्ये ‘ळ’ अक्षर होते
(‘अग्निमींळे पुरोहिंतम्’ – ऋग्वेद 1.1.1) आणि पाणिनींच्या संस्कृत व्याकरणाने
‘ळ’चा त्याग केला, म्हणून आजच्या संस्कृतमध्ये ‘ळ’ नाही.
वर दिलेल्या विश्लेषणातून ‘ए, ओ, ऐ, औ’ या स्वरांबाबत संस्कृतने व्याकरणात जे
स्विकारले आहे त्याला कोणतीही नैसर्गिक सयुक्तिकता वा विचारसरणी नसल्याचे स्पष्ट
होते.
उदाहरण 1 – ‘‘ए = (अ
किंवा आ + इ
किंवा ई)’’, यातून आपल्याला ‘ए’बाबतच्या संस्कृत व्याकरणीय उच्चार-विश्लेषणाचे चार
भाग हाती येतात. (1) ‘ए = अ+इ’, (2) ‘ए = आ+इ’, (3) ‘ए = अ+ई’, (2) ‘ए = आ+ई’. आता जगातल्या कोणत्याही मानवाला ‘ए’ उच्चारायला सांगून
त्याला ऐकू येणार्या ‘ए’ मध्ये सुरवातीपासून शेवटपर्यंत अखंडीतपणे एकाच स्वराचे
ज्ञान होते ना? हे कोणीही पडताळून पहावे.
मराठीला ही नैसर्गिक उपजतता स्विकारता आणि भाषेत वापरता आलेली आहे, संस्कृतला
ती स्विकारता व भाषेत वापरता आलेली नाही.
यात संस्कृत भाषेला कोणताही दोष देण्याचा काडीमात्र प्रयत्न नाही, हे पुन्हा
सांगावे लागत आहे कारण आपल्याकडे संस्कृत भाषेच्या व्याकरणाबाबत ‘संशोधनात्मक परखड
विचारांची मांडणी’ स्विकारली जात नाही, हा माझा अनुभव आहे. ‘संस्कृत म्हणजे
देवभाषा’, असे लहानपणापासून शिकवले जात असल्याने, ‘संस्कृतमधला कोणताही दोष दाखवणे
म्हणजे सनातन धर्मावर आघात करणे’ असे मानले जाते. संस्कृतवरच्या अशा अपरिमित,
अवाजवी भक्तिमुळेच पाणिनी-व्याकरणाबाबत एकमेव सर्वात्तम, सर्वात अचूक, अधिकतम
शास्त्रीय अशी ख्याती पसरलेली आहे. जगातील इतर भाषांनी संस्कृतच्या व्याकरणाचा
अभ्यास करून ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या धोरणानुसार संस्कृतला सर्वोत्तम-भाषेचा
दर्जा दिला आहे. आपण भारतीयांनी संस्कृत जपलीच पाहीजे यात वाद नाही. पण भाषा
म्हणून संस्कृतपेक्षाही मराठी किती क्षेष्ठ आहे हे मांडणे मानवाच्या हितासाठी
गरजेचे आहे. संस्कृतबाबतची एकप्रकारची अंधश्रद्धेने समाजात एकप्रकारची ‘धास्ती,
धसका, भिती, दहशत’ पसरवलेली आहे. मराठी व्याकरणकारांनी संस्कृतचे व्याकरण मराठीत
घुसडल्याबाबत कोणीही कोणताही आवाज आजवर उठवला नाही आणि आपण सर्व मराठीची मानहानी,
मिंधेपण सोसत आलो. आता यापुढे तरी मराठीने आपल्या लिपीचे नाव ‘मराठमोळी’ घोषीत
करून व्याकरणातून स्वतंत्र, स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि शास्त्रीयता स्विकारावी.
संस्कृतने स्वरांबाबतचे असे अनैसर्गिक धोरण स्विकारल्यामुळे पाणिनींना संस्कृत
व्याकरणात ‘स्वरसंधी’ याबाबतचे पुढील सतरा नियम आणता आले. 1] अ किंवा आ+अ किंवा आ = आ (तत्र+अरण्ये=तत्रारण्ये,
अत्र+आसीत्=अत्रासीत्, यदा+आगच्छति=यदागच्छति,
कदा+अनयत्=कदानयत्)
2] इ किंवा
ई+इ
किंवा ई = ई
(अपि+इह=अपीह,
अस्ति+ईश्वरः=अस्तीश्वरः,
वापी+इतः=वापीतः,
नारी+ईक्षते=नारीक्षते),
3] उ किंवा
ऊ+उ
किंवा ऊ = ऊ (साधु+उक्तम्=साधूक्तम्,
साधु+ऊचुः=साधूचुः, वधू+उक्तिः=वधूक्तिः,
वधू+ऊढा=वधूढा),
4] ऋ+ऋ = ॠ (पितृ+ऋणम्=पितृणम्)
कृपया ‘पितृणम्’ शब्दातील ‘ऋ’ हा ‘ॠ’ आहे असे समजावे, 5] अ किंवा आ+इ किंवा ई = ए (परम+ईश्वर=परमेश्वर,
ईश्वर+इच्छा=ईश्वरेच्छा,
तथा+इति=इथेति,
रमा+ईशः=रमेशः),
6] अ किंवा
आ+उ
किंवा ऊ = ओ
(मित्र+उत्साह=मित्रोत्साहः,
तत्र+ऊर्ध्वम्=तत्रोर्ध्वम्, रमा+उवाच=रमोवाच, तदा+ऊचुः=तदोचुः),
7] अ किंवा
आ+ऋ = अर् (देव+ऋषिः=देवर्षिः,
तदा+ऋषभः=तदर्षभः), 8] अ किंवा आ+ए किंवा ऐ = ऐ (एक+एकशः=एकैकशः,
नृप+ऐश्वर्यम्=नृपैश्वर्यम्,
बाला+एका=बालैका,
बाला+ऐक्षत=बालैक्षत),
9] अ किंवा
आ+ओ
किंवा औ = औ (तस्य+ओजः=तस्यौजः, शाला+ओकस्=शालौकस्, चिद्या+ओषधिः=विद्यौषधिः,
भार्या+औषधिम्=भार्यौषधिम्),
10] इ किंवा
ई+इ
किंवा ई खेरीज कोणताही स्वर = य्+’तो स्वर’ (इति+आलोच्य=इत्यालोच्य, इति+उवाच=इत्युवाच, नदी+अत्र=नद्यत्र,
इति+ऋषि=इत्यृषिः),
11] उ किंवा
उ+ऊ
किंवा ऊ खेरीज कोणताही स्वर = व्+’तो स्वर’ (मधु+आनय=मध्वानय्, वधू+इच्छा=वध्विच्छा, साधु+ऋषि=साध्वृषिः),
12] ऋ किंवा
ॠ+ॠ
किंवा ऋ खेरीज कोणताही स्वर = ‘र्+तो स्वर’ (कर्तृ+इति=कर्त्रिति, मातृ+उक्ति=मात्रुक्तिः), 13] ए+अ किंवा ओ+अ = ए किंवा ओ
किंवा ऽ (अवग्रह चिन्ह) (जने+अस्मिन्=जनेस्मिन्, जने+अस्मिन्=जनेऽस्मिन्, प्रभो+अत्र=प्रभोत्र, प्रभो+अत्र=प्रभोऽत्र), 14] ए+‘अ खेरीज
कोणताही स्वर’ किंवा ओ+‘अ खेरीज कोणताही स्वर’ = ‘ए’चा ‘अय्’ किंवा ‘ओ’चा ‘अव्’ होतो व
त्यात पुढील स्वर मिसळतो (हरे+इति=हरयिति, हरे+इति=हर इति, प्रभो+एहि=प्रभवेहि, प्रभो+एहि=प्रभ एहि),
15] ऐ किंवा
औ +
‘कोणताही स्वर’ = ‘ऐ’चा
आय् किंवा ‘औ’चा ‘आव्’ होतो. (तस्मै+इदम्=तस्मायिदम्, तस्मै+इदम्=तस्मा
इदम्, रामौ+एतौ=रामावेतौ,
रामौ+एतौ=रामा
एतौ), 16] अपवाद
– शब्दाच्या द्विचवनाच्या रूपाच्या अंती असणार्या ‘ई, ऊ किंवा ए’ यांचा आणि ‘अमी’
(अदस् – पुल्लिंगी प्रथमेचे बहूवचन) या रूपातील ‘ई’चा पुढील स्वराशी संधी होत नाही
(गिरी+एतो=गिरी
एतौ, गुरू+इच्छतः=गुरू
इच्छतः, मित्रे+ईक्षेते=मित्रे
ईक्षेते, वन्दावहे+आवाम्=
वन्दावहे आवाम्, अमी+अश्वाः=
अमी अश्वाः, रमेते+अत्र= रमेते
अत्र), 17]
ओकारान्त आणि एकस्वरात्मक अव्ययांतील स्वराचा त्यापुढील स्वराशी संधी होत नाही.
(हे+इन्द्र=
हे इन्द्र, अहो+ईशाः=
अहो ईशाः)
मराठीत ‘सतराशे-साठ नियम आहेत’, ‘सतराशे-साठ गोष्टी एकालाच कशा करता येतील?’
असा ‘सतराशे-साठ’ हा शब्दप्रयोग संस्कृतच्या या सतरा नियमांतून साकारणार्या साठ
प्रकारांवरून तर पडला नाहीना?!
मराठीत असे कोणतेही नियम नाहीत. पण आजच्या मराठीच्या व्याकरणातून, संस्कृतच्या
व्याकरणाची नक्कल करून, त्यातील जास्तीजास्त नियम ओढूनताणून आणले गेले आहेत.
याबाबत भविष्यकाळात विविध लेखांतून चर्चा होईल. पानांच्या मर्यादा लक्षात घेऊन लेख
संपवावे लागतात. अर्थात पुढील लेखात याच्याच पुढच्या भागाची सुनावणी होईल.
याशिवाय आम्हाला अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच ‘जाणीवजनक’
https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या
ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मिळवा.
No comments:
Post a Comment