जाणिवजनक - भाग 7
मानवी भाषेने स्वर आणि व्यंजन स्विकारण्याबाबतचे अचूक निर्णय कोणत्या नैसर्गिक
नियमांवर आधारलेले असावेत? मराठीने त्यांचे पालन केले आहे का?
मराठी भाषा याबाबत श्रेष्ठ ठरते. ते कसे? याचा बारकाईने विचार करू. ‘अचूक
निर्णय’ याचा अर्थ आधी आपण समजून घेऊ. आधुनिक युगातील भाषा ‘ध्वनी, कागद व संगणक’
तीन माध्यमातून वावरते. ध्वनीला चिन्ह स्वरूपातून आपण कागदावर वावरायला लावतो
त्याला आपण लेखन म्हणतो. सामान्यपणे याला भाषा म्हणतात. पण मराठीने केलेला भाषीक
प्रवास इतका अचूक आहे की ध्वनी माध्यमाच्या वापराच्या वेळीच मराठीने त्यानंतरच्या
‘कागद व संगणक’ यांची तयारी अचूकतेने व शास्त्रीयतेने केलेली आढळते.
मराठीच्या ‘मराठमोळी’ लिपीतून ‘उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन व अर्थ’ यांचा
वावर होतो. हा वावर त्यांच्या परस्पर अतूट एकजूटीतून साकारतो, हे यात सर्वात जास्त
महत्त्वाचे ठरते. यातील प्रत्येक भाग वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा आहे. आजवर आपण
मराठीबाबत पुस्तकातून जे शिकलो त्यापेक्षा हा भाग मांडणी म्हणून जरी अत्यंत वेगळा
असला तरी तो पूर्णपणे मराठीच ठरतो. ‘उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन व अर्थ’ यांच्या
अचूक नैसर्गिकतेच्या तपासणीसाठी त्या प्रत्येकाबाबतची अंमलबजावणीतील प्राथमिक
संहीता मांडत आहे. ‘यातील अयोग्यता दाखवून द्यावी’, असे भाषा-तज्ञ व
साहित्य-जाणकार व्यक्तिंना आव्हान आणि सर्व मराठी समाजाला मी आवाहन करत आहे. कारण
आपण मराठीच्या भविष्याचा विचार इथे करत आहोत, कोणी शुभानन गांगल सांगतोय म्हणून
नव्हे, तर मराठी भाषेने एवढी उच्चपातळी खरोखरच गाठली आहे म्हणून ‘मराठमोळी’चा लिपी
म्हणून स्विकार करणे गरजेचे आहे. यात ‘शाश्वत-गृहीते’ हा ‘तरतुद’ हे शब्दप्रयोग
केलेला आहे. ‘शाश्वत-गृहीते’ म्हणजे ‘निसर्गाने मानवावर लादलेले नियम, ‘तरतुद’
म्हणजे ‘शाश्वत-गृहीतां’च्या अंमलबजावणीसाठी भाषेने केलेली उपाययोजना’ होय. आपण
लेखांतील पानांचा विचार लक्षात घेऊन टप्प्या टप्प्याने या प्रश्नाचे उत्तर पूर्ण
करणार आहोत.
‘उच्चार’ –
शाश्वत-गृहीत-1 = भाषेत वापरले जाणारे उच्चार, ‘वेदना न देणार्या’ व ‘सर्वाना
सहजतेने मुखातून निर्माण करता येणार्या’, ध्वनीच्या गुणधर्मांवर आधारीत असावेत.
तरतुद-1.1 = ध्वनीतील लहान-मोठेपणा (Loudness) जर जास्त डेसिबलचा झाला तर त्यातून
कानाला वेदना होतात. लहान वा मोठ्या आवाजाला भाषेने खास वेगळे अर्थ प्रदान
करण्याची भाषीक गरज नसते. ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर’ वा विचार-भावना
यांच्या आदानप्रदानात ध्वनीच्या ‘लहान-मोठेपणाचा वापर कसा करावा याची जाण
नैसर्गिकपणे आपोआप माहीत होते. त्यामुळे लहान-मोठेपणा या ध्वनी गुणधर्मावर मराठीने
भाषीक-अर्थ अवलंबून ठेवलेला नाही.
तरतुद-1.2 = ध्वनीतील उच्च-नीचता (Frequency) मानवाला 100, 150, 200 वा 250 अशी
कोणतीही फ्रिक्वेन्सी अचूकतेने उच्चारातून प्रत्येकाला गाठता येत नाही आणि म्हणून
ठराविक फ्रिक्वेन्सीतील उच्चारांचा संबंध भाषीक-अर्थाशी जोडता येत नाही. त्यामुळे
उच्च-नीचता या ध्वनी गुणधर्मावर मराठीने भाषीक-अर्थ अवलंबून ठेवलेला नाही.
संस्कृतने मात्र स्वराच्या उच्चाराचा संबंध, उदात्त (High Pitch), अनुदात्त (Low Pitch), आणि स्वरीता
(Falling Pitch)
याप्रकारे भाषीक अर्थाशी जोडलेला आहे. त्यामुळे संस्कृत-भाषेतील स्वरांचा उच्चार
त्यातील अशाप्रकारे वा योग्यता पाळत
वापरण्याची किमया फार फार वर्षांपूर्वीही सर्वांना जमत नव्हती. आता तर हे उच्चार
नक्की कसे तेही माहीत असलेल्या व्यक्ति शोधून सापडत नाहीत. संस्कृतमधले स्वर-ज्ञान
शिकल्याशिवाय संस्कृत वापरली तर उच्चारातील उच्च-नीचतेमुळे अर्थाचा अनर्थ होतो हे
माननीय संस्कृत व्याकरणकार पतंजलीने हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले आहे. पतंजलीने
सांगितलेले
उदाहरण – वृत्राच्या पित्याने म्हणजे त्वष्ट्याने आपल्याला इन्द्राचा बध
करणारा मुलगा व्हावा म्हणून यज्ञ केला. या यज्ञात पुत्राची मागणी करताना त्याने
‘इन्द्रशत्रु’ हा शब्द म्हणताना स्वरातील उच्च-नीचता चूकीची वापरली. संस्कृतमध्ये
‘इन्द्रशत्रु’ हा शब्द जर ‘अन्तोदात्त’ वापरला तर तो त्तपुरुष-समास होऊन त्याचा
अर्थ ‘इन्द्राला मारणारा’ असा होतोपण हाच शब्द जर ‘आद्युदात्त’ वापरला तर तो
बहुव्रीही-समास होऊन त्याचा अर्थ ‘इन्द्र ज्याला मारणार आहे तो’ असा होतो.
या उदाहणातील ‘इन्द्रशत्रु’ या शब्दाचा मराठीतून विचार केला तर त्यात ‘इ’,
‘न्द्र’, ‘श’, ‘त्रु’ अशि चार अक्षरे आहेत आणि त्यात असलेले क्रमवार स्वर ‘इ, अ, अ
आणि उ’ आहेत. ‘इन्द्रशत्रु’ शब्दातील ‘स्वर’ उच्च-नीचतेच्या वापरातून ‘अन्तोदात्त’
वा ‘आद्युदात्त’ कसा उच्चारायचा हे मराठी-भाषेच्या परीघात येत नाही. मराठीने
‘शाश्वत-गृहीत-1’ याची संस्कृतपेक्षा अधिक चांगली ‘तरतुद’ भाषेत केली आहे हे येथे
स्पष्ट होते. या संस्कृतला दोष देण्याचा काडीमात्रही प्रयत्न नाही. साडेतीन हजार
वर्षांपुर्वी जेव्हा भाषेचे अस्तित्व केवळ ध्वनीवर आधारीत होते तेव्हा ध्वनीतील
सर्व गुणधर्मांचा वापर संस्कृतने केला, यात ‘संस्कृतला ध्वनीतील गुणधर्म’ माहीत
होते हेच सिद्ध होते. संस्कृत-भाषा कागदी-वृत्तीला जोपासणारी ठरत नाही हेही यातून
सिद्ध होते. आता संस्कृत देवनागरीतून वावरते. आज किती जणांना ‘इन्द्रशत्रु’ यातील
‘इ, अ, अ आणि उ’ या स्वरांचा उच्चार ‘अन्तोदात्त’ वा ‘आद्युदात्त’ करण्याचे
दाखवण्यासाठी, कोणती खास चिन्हे कागदावर वापरावीत?, हे माहीत आहे?. समजा ती दाखवली
तरी किती जणांना त्यातील बदललेला भाषीक-अर्थ कळणार आहे? संस्कृत भाषेला तिचे
व्याकरण सोडून मुक्त होता येत नाही. पाणिनिंच्या व्याकरणाने केवळ 2115 धातुंच्या
वापरातून सर्व शब्द (पद) बनविण्याची मर्यादा संस्कृतवर लादलेली आहे. संस्कृतमध्ये
धातुचे दहा गण (समूह) आहेत. प्रत्येक गाणाचे विकरण (खूण) ठरलेली आहे. हे विकरण
धातुला लागून ‘अंग’ तयार होते. या ‘अंगा’ला प्रत्यय लागून क्रियापदे बनतात. धातुचा
उपयोग वाक्यात करता येत नाही. असलेल्या 2115 धातुंपेक्षा एकही नवा ‘धातु’
संस्कृतला स्विकारता येणार नाही. समजा संस्कृतला ‘जॉर्ज’ शब्द स्विकारायचा असला तर
त्यासाठीचा ‘धातु’ म्हणून ‘जॉर्ज’ जर स्विकारला तर तो शब्द ‘अ’ने शेवट होणारा
असल्याने ‘पुल्लींगी’ कदाचीत ठरवता येईल! पण तो शब्द संस्कृतमध्ये ‘देवः देवौ
देवाः ।’ सारखा ‘जॉर्जः जॉर्जौ जॉर्जाः ।’ असा चालवून संस्कृत-व्याकरणातून
अभ्यासक्रमात शिकवता येईल का? याचा अर्थ संस्कृतला ‘अॅ’ व ‘ऑ’ स्विकारता येतील का?
असाही होतो आणि याचे उत्तर ‘नाही’ ठासून द्यावे लागते.
मराठीने देवनागरीतच राहून स्वतःच्या लिपीला ‘मराठमोळी’ म्हणून जाहीर करणे किती
महत्त्वाचे आहे? हे अशा प्रत्येक प्रश्नातील उत्तरांच्या अनुषंगाने लक्षात येणार
आहे.
हा लेख इथेच आटोपता घेत आहे. अर्थात पुढील लेखात याचीच पुढील सुनावणी होईल.
याशिवाय आम्हाला अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच ‘जाणीवजनक’
https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या
ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मिळवा.
No comments:
Post a Comment