जाणिवजनक - भाग 6
‘अॅ’ व ‘ऑ’ स्वर मराठीने स्विकारले असे कसे ठरवता येईल?
आपण बोलतो त्यातच व्याकरण असते, हा मराठीचा महत्त्वाचा अंगभूत गुण आहे. मराठीत
अनेक नवनवीन शब्द येतात. मराठी भाषा ओघवती आहे. येणारे नवे शब्द हळूहळू प्रस्थापीत
होतात. त्यामुळे नवे शब्द प्रस्थापीत होताना आणि ते शब्द मराठीत रूळलेले असताना
अशा दोन्ही वेळांना नक्की जोखता येईल अशी सोय मराठीत होणे गरजेचे आहे. नवे
शब्द-कोष हा मार्ग किचकट, मर्यादित वापराचा आणि सहज उपलब्ध नसलेला ठरतो. जर आपण
बोलतो त्यातच व्याकरण असते तर मराठीच्या बोली-व्याकरणाच्या आधारे मराठीत येऊ
घातलेला वा स्थिरावलेला शब्द शोधता येणे गरजेचे ठरते. त्या दृष्टीने बारकाईने
विचार करून मराठीसाठी तीन ‘परीस कसोट्या’ निर्माण केल्या आहेत. जसे सोन्याचा कस
परीस शोधतो तसेच येऊ घातलेले आणि मराठीत स्थीर झालेले शब्द कोणालाही स्वतःच शोधता
व नक्की करता येतात. त्यासाठी कोणत्याही व्याकरणकाराची वा पुस्तकी संदर्भाची गरज
नाही. रसायन शास्त्रात जशी ‘लिटमस टेस्ट’ (Litmus Test) असते तशीच ही ‘परीस कसोटी’ आहे.
‘लिटमस टेस्ट’ (Litmus
Test) मध्ये निळा लिटमस-पेपर जर द्रव-पदार्थात बुडवला आणि तो पेपर लाल झाला तर तो
द्रव-पदार्थ अॅसिड असतो. अगदी कोणतीही चुक न होता म्हणजेच बिनचूकपणे कोणतेही अॅसिड
ओळखण्यासाठी ‘लिटमस टेस्ट’ (Litmus Test) वापरली जाते. अगदी तसेच कोणताही शब्द मराठीत आहे की नाही?
हे ओळखण्यासाठी ‘परीस कसोटी’ वापरता येते. आपण ‘परीस कसोटी’ वापरून बघण्यासाठी ‘रेल्वे’
हा शब्द घेऊ.
‘परीस कसोटी-1’ – ‘रेल्वे आला’ हे वाक्य बरोबर की ‘रेल्वे आली’ हे बरोबर?
महाराष्ट्रातील नागपूरपासून मुंबईपर्यंत कोणाचेही याबाबत काय उत्तर असेल? सर्वांना
‘रेल्वे आली’ हे बरोबर आणि ‘रेल्वे आला’ हे चूक असेच नक्की, म्हणजे गीतेवर हात
ठेऊन शपथपूर्वक, सांगता येईल ना? शब्दाला कोणते लिंग मराठीने ठरवले आहेत? हे शोधणे
आणि त्यातून मराठीत तो शब्द आहे? की नाही? हे तपासणे, ही झाली ‘परीस कसोटी-1’.
‘परीस कसोटी-2’ – ‘आज माझी रेल्वे उशीरा धावत होती’, ‘आज सर्व रेल्वे उशीरा
धावत आहेत’ ही दोन्ही वाक्ये बरोबर आहेत ना? यातून ‘रेल्वे’ शब्दाचे एकवचनी आणि
अनेकवचनी रूप आपण मराठीसाठी तपासले. एकवचन आणि अनेकवचनात तो शब्द सहजपणे वापरता
येतो ना? या टेस्टचे नाव आहे ‘परीस कसोटी-2’. इंग्रजीत ‘railway’ शब्दाचे
अनेकवचन ‘railways’ असे
होते. पण मराठीत मात्र आपण ‘रेल्वे’चे अनेकवचन ‘रेल्वे’च करतो. त्याचे ‘रेल्वेज्’
करत नाही.
‘परीस कसोटी-3’ – ‘काय रे तु विमानाने आलास की रेल्वेबिल्वेने आलास?’ हे वाक्य
सहजतेने उच्चारले जाते. त्यात कोणाला काहीही अडचण भासत नाही. जेव्हा
‘रेल्वेबिल्वे’ प्रमाणे ‘इंजिनिअर-बिंजीनिअर’, ‘डॉक्टर-बिक्टर’ असे सहजतेने लावता
येते व वाक्यातून वापरता येते तेव्हा तो शब्द मराठीत लोणच्यासारखा मुरला आहे असे
समजावे. शब्दाला ‘बिल्वे’ वा तशी जोडगोळी लावता येणे ही झाली ‘परीस कसोटी-3’.
‘परीस कसोट्या’ ‘लिटमस टेस्ट’ (Litmus Test) सारख्याच अचूक आहेत हे कशावरून?
‘रेल्वे’ हा शब्द मुळात इंग्रजीतील आहे. इंग्रजी भाषा केवळ सजीवतेला लिंग
प्रदान करते. मराठी भाषा सजीव आणि निर्जिव दोघांनाही लिंग प्रदान करते. ‘रेल्वे’
शब्दाला कोणते लिंग द्यावे हे कोणत्याही व्याकरणकाराने मराठीला सांगितले नाही. तरी
महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातील प्रत्येक मराठी माणसाने ‘रेल्वे’ शब्दाला
स्त्रीलिंग प्रदान केले. यातील अतीसुक्ष्म बारकावे जाणण्यासाठी आम्ही अनेक वर्षे
बरेच संशोधन केले. त्यातून मराठीसाठीची ‘ध्वनी-वृत्ती’, ‘कागदी वृत्ती’,
‘संगणकीय-वृत्ती’ असे नवीन विषय 25 वर्षांपुर्वी निर्माण करून त्यांचा बराच अभ्यास
झाला. हे सर्व संशोधन, म्हणजेच भाषा-विज्ञानातील विद्वत्ता सांगण्यापेक्षा,
त्यातून आम्ही सामान्यांसाठी उपयोग क्षमता निर्माण केली. त्याचाच एक भाग म्हणजे या
‘परिस कसोट्या’ आहेत.
काही वर्षांपूर्वी बर्याच व्यक्ति ‘रेल्वे’ न म्हणता ‘आगगाडी’ असा शब्द वापरा,
असे सांगत असत. मराठीने कोणता शब्द स्विकारावा ते मराठी समाज ठरवतो, कोणी
व्याकरणकार वा सन्मानीय व्यक्ति वा सरकार ठरवू शकत नाही. आता तुम्ही ‘वेळ किती
झाली?’ असे विचारण्यापेक्षा ‘टाईम काय झाला?’ हे अधिक मराठी ठरते! पूर्वी
आजोबांच्या जमान्यात त्यांनी ‘आज मला लावण्यवती भेटली’ म्हटले असेल, वडिलांच्या
काळात त्यांनी त्यासाठी ‘सुंदरी’ शब्द वापरला असेल, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने
त्याच कारणासाठी ‘चिकनी’, ‘कंडा’ आले आणि आता ‘सेक्सी’ शब्द त्याच अर्थाने मराठी
तरूणांत वापरला जातो. जर कॉलेजात जाणार्या नातवाने ‘आजोबा आज मला लावण्यवती
भेटली’ असे सांगितले तर ‘नातवाची तब्येत ठीक आहे का?’ असे आजोबांना वाटेल.
थोडक्यात म्हणजे काळानुसार नवे शब्द मराठीत येतात आणि स्थिरावतात. जुन्या
शब्दांना टिकवून ठेवण्याचा हव्यास वा जुन्या शब्दांना नेस्तनाबूत करण्याचा चंग
कोणीही बाळगु नये. मराठीला तिचा नैसर्गिक ओघवतेपणा झर्यासारखा झुळझुळत ठेवता यावा
यासाठी सर्वसमावेशकाची भुमिका सर्वांनी घेणे गरजेचे आहे. यातून अनेक भाषांतून
असलेले अनेक शब्द त्यातील जास्तीतजास्त चांगुलपणा, नवीन अर्थ आणि नवे विचार घेऊन
येणे गरजेचे आहे. ज्यांना जुने मराठी शब्द म्हणजेच मराठी असे वाटत असेल त्यांना
‘ज्ञानेश्वरां’च्या काळातील किती मराठी शब्द येतात? आणि आता त्या जुन्या शब्दांतून
आधुनिक संवाद साधता येईल का? यापुढे वर्तमानकाळातील मराठी आणि पुढील युगातील मराठी
याकडेच केवळ अधिक लक्ष द्यायला हवे.
मराठी स्वतःचा आत्मसन्मान आणि मूलभूत उपजत वृत्ती जोपासतच दुसर्या भाषेतील
शब्द आत्मसात करते. आजवर पुस्तकी व्याकरणाने मराठीच्या याच स्वभावाला ओळखले नाही
आणि पुस्तकी व्याकरण ‘संस्कृत भाषेतील बरेच शब्द मराठीने जसेच्या तसे स्विकारले’
असे समजून नियम निर्माण केले. त्यातून ‘शुद्धलेखन नियमावली’चा जन्म झाला. मराठीवर
असे लादलेले व्याकरण मराठीने स्विकारले नाही. समाजाला ‘शुद्धलेखन नियमावली’चे 18
नियम पाळता येत नाहीत कारण ते मुळात मराठीचे ठरत नाहीत. तरीही भाषा-तज्ञ व
साहित्य-जाणकार समजलेल्या व्यक्ति ‘जगात सर्व भाषांना नियम आहेत मराठी
व्यक्तिंनीही नियम पाळले पाहिजेत.’ असा डंका पिटत राहतात. मूलभूत उपजत मराठीचा शोध
घेण्यासाठी त्यांनी आता तरी अभ्यास करावा, ही विनंती.
अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच ‘जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या
ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मिळवा.
No comments:
Post a Comment