Tuesday, 7 January 2014

जाणिवजनक - भाग 5



जाणिवजनक - भाग 5

‘मानवी भाषेतील सर्वात सुक्ष्म स्वर मराठीतील ठरतात’, हे तुमचे विधान स्पष्ट कराल का?
ज्याची फोड करता येत नाही असा स्वर म्हणजे ‘सुक्ष्म’ स्वर होय. स्वराचा ‘उच्चार’ करता येतो आणि तो ‘ऐकू’ येतो. यातील ‘उच्चार’ आणि ‘ऐकू’ येणे या दोन्ही गोष्टीबाबत भाषेने स्वराची ओळख किती सुक्ष्मतेने करून घेतली असून त्याचा भाषेतील वापरही तसाच सुक्ष्मतेने होतो ना?, हे बघणे गरजेचे आहे. ‘स्वर’ची निर्मिती होताना, म्हणजेच ‘स्वरा’चा ‘उच्चार’ होताना, जिभेचा स्पर्श मुखातील कोणत्याही भागाला होता कामा नये, हा सहज सोपा नियम सर्व मानवी भाषांना लागू पडतो.
इंग्रजीने बर्‍याच वर्षांपूर्वी ‘y’ ला स्वर ‘Vowel’ मानले होते. आता इंग्रजीने त्यात बदल करून ‘y’ ला स्वर व्यंजन मानले आहे. व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय मानवाला करता येत नाही, हा सुद्धा सर्व मानवी भाषांना लागू होणारा निसर्ग नियम आहे. पण इंग्रजीत ‘Rhythm’ या शब्दात एकही स्वर ‘Vowel’ नाही सर्व केवळ व्यंजने ‘Consonant’ आहेत तरीही इंग्रजीने तो शब्द म्हणून स्विकारला आहे. ‘Rhythm’ याचा इंग्रजीतील उच्चार ‘riŦH́əm’ असा होतो हे इंग्रजी डिक्शनरीत दिलेल्या ‘Symbol Spelling’ मधून बघून कळते. यातील ‘i’ आणि ‘ə’ हे इंग्रजीतील स्वर-उच्चाराचे द्योतक आहेत. ‘English’ मधल्या ‘E’ लेटरचा, been’ मधल्या ‘ee’ लेटरचा, bit’ मधल्या ‘i’ लेटरचा, sieve’ मधल्या ‘ie’ लेटरचा, woman’ मधल्या ‘o’ लेटरचा, busy’ मधल्या ‘u’ लेटरचा, build’ मधल्या ‘ui’ लेटरचा, hymn’ मधल्या ‘y’ लेटरचा,  जो व जसा उच्चार होतो तसा उच्चार डिक्शनरीतील ‘Symbol Spelling’ मधून ‘i’ ने दर्शवला जातो. तसेच ‘alone’ मधल्या ‘a’ लेटरचा,  moment’ मधल्या ‘e’ लेटरचा,  pencil’ मधल्या ‘i’ लेटरचा,  come’ मधल्या ‘o’ लेटरचा,  but’ मधल्या ‘u’ लेटरचा, जो व जसा उच्चार होतो तसा उच्चार डिक्शनरीतील ‘Symbol Spelling’ मधून ‘ə’ ने दर्शवला जातो. म्हणजेच इंग्रजी भाषा ज्याला लेटर्सना स्वर (Vowel) मानते त्या सर्व म्हणजे  a, e, i, o, u’ यांचा उच्चार ‘अ’ असा होण्याची सोय इंग्रजीत आहे.
इंग्रजीने जरी केवळ ‘a, e, i, o, u’ यांना स्वर ‘Vowel’ मानले असले तरी इंग्रजी शब्दांच्या खरोखरच्या उच्चारातून मात्र मराठीने स्विकारलेलेच स्वर इंग्रजी भाषा वापरते. आपण ‘H’ (ह) व्यंजनातून (Consonant) बनलेले इंग्रजी शब्द उदाहरणा दाखल पाहू. या उदाहरणात मराठीची ‘ह’ची बाराखडी आणि त्या उच्चारासाठीचा इंग्रजी शब्द देत आहे. ‘hug’ शब्दातील ‘hu’ चा उच्चार ‘ह’, ‘heart’ शब्दातील ‘hea’ चा उच्चार ‘हा’, ‘hill’ शब्दातील ‘hi’ चा उच्चार ‘हि’, ‘heal’ शब्दातील ‘hea’ चा उच्चार ‘ही’, ‘hook’ शब्दातील ‘hoo’ चा उच्चार ‘हु’, ‘who’ शब्दातील ‘who’ चा उच्चार ‘हू’, ‘hay’ शब्दातील ‘ha’ चा उच्चार ‘हे’, ‘height’ शब्दातील ‘heigh’ चा उच्चार ‘है’, ‘hose’ शब्दातील ‘ho’ चा उच्चार ‘हो’, ‘houses’ शब्दातील ‘hou’ चा उच्चार ‘हौ’, ‘hand’ शब्दातील ‘ha’ चा उच्चार ‘हॅ’, ‘hall’ शब्दातील ‘ha’ चा उच्चार ‘हॉ’, असा होतो.
‘ए’ स्वर ‘अ+इ’ वा ‘अ+ई’ वा ‘आ+इ’ वा ‘आ+ई’ असा चार प्रकारातून साकारतो असे संस्कृतचे व्याकरण म्हणते. तसेच ‘ओ’ स्वर ‘अ+उ’ वा ‘अ+ऊ’ वा ‘आ+उ’ वा ‘आ+ऊ’ असा चार प्रकारातून साकारतो असे संस्कृतचे व्याकरण म्हणते. म्हणजेच स्वराची ओळख याबाबत संस्कृतला एकच निश्चित ठोस धोरण वा स्वर उच्चारातील तटस्थपणातून साकारणारा एकक मांडता आणि भाषेतून वापरता आलेला नाही.
संस्कृतच्या व्याकरणाची तंतोतंत नक्कल करत लिहिल्या गेलेल्या मराठी-पुस्तकी-व्याकरणात आजही हेच संस्कृतचे धोरण ‘मराठीचे’ म्हणून चुकीने मांडले गेले आहे. जगातल्या कोणत्याही मानवाने ‘ए’ वा ‘ओ’ चा उच्चार एक, दोन, तीन सेकंद वा श्वास टिकेपर्यंत लांब करून बघावा, त्यातून ऐकू येणारा आणि उच्चाराच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत अखंड टिकणारा एकच नाद, आवाज, ध्वनी ऐकू येतो हे कळेल.
जगातील सर्व मानवी भाषांच्या चोविस कुटूंबातील सर्व भाषांत मराठीचेच स्वर-ज्ञान असते हे दाखवून देता येते. याचे कारण ‘कोणत्याही मानवाला भाषेतील कोणताही स्वर हा केवळ स्वतःच्या स्वरयंत्र ते ओठ या निसर्गाने दिलेल्या प्रयोगशाळेतूनच उच्चारावा लागतो आणि मराठीने याच नैसर्गिक नियमांतून स्वर-रचना स्विकारली आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन आणि अर्थ’ या सर्वांतून तशीच राबवली आहे. आधुनिक युगातील मराठीचे उपजत, मूलभूत, स्वतंत्र, तटस्थ, स्वावलंबी आणि शास्त्रीय व्यवस्थापन (व्याकरण) आणण्यासाठी मराठी लिपिला ‘मराठमोळी’ नाव देणे अत्यंत गरजेचे ठरते.

‘अॅ’ व ‘ऑ’ हे स्वर पुर्वीच्या मराठीत नव्हते. ते आता मराठीत आहेत असे कसे म्हणता येईल? मराठी व्याकरणात ते अधिकृतपणे स्विकारले गेले आहेत का?
व्याकरण म्हणजे भाषेत काय, कसे, किती, कुठे’ आहे ते सांगणे होय. भाषेने कसे वागावे? भाषेने काय करावे? भाषेत काय असावे? या गोष्टी व्याकरणकारांच्या अधिकारता येत नाहीत. मराठीला बदलण्याचा अधिकार मराठीने कोणालाही दिलेला नाही. भाषा कशी वागते? भाषा काय करते? भाषेत काय आहे? असा परिसर व्याकरणकारांनी हाताळायचा असतो. पण आजपर्यंत संस्कृतच्या आदरयुक्त भितीपोटी, पाणिनींचे व्याकरण मराठीवर लादले गेले तरी कोणीही आवाज उठवला नाही. त्यामुळे मराठीचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठीच्या प्रगतीचा मार्ग खुंटला आहे. मराठीला संस्कृतच्या गुलामगिरीत जखडले गेले आहे. संस्कृतला ‘अॅ’ व ‘ऑ’ स्विकारता येणार नाहीत कारण संस्कृत-भाषा कुपमंडीत आहे. स्विकारलेल्या उच्चारांच्या अनुषंगानेच (वर्ण) तसेच कायम स्वरूपी वावरायचे धोरण संस्कृतने स्विकारले आहे. अर्थात ‘भाषेतील शब्दांना बदलण्याची संधीच द्यायची नाही’, या तत्त्वावर थोर पाणिनींनी संस्कृतचे व्याकरण रचले. त्यांच्या या अभिनव अद्वितीय रचनेमुळे हजारो वर्षांपुर्वी भारतीय संस्कृतीतून घडलेल्या ‘वेद-उपनिषद’ वगैंरेंचा अभ्यास आपणास अजूनही करता येतो. मराठी भाषा ओघवती आहे. मराठीच्या ओघवतेपणातही मराठीचे मूलभूत उपजत अस्तित्व तसेच कायम राहते. ज्ञानेश्वर, शिवाजी, पेशवे यांच्याकाळातील मराठी आणि आजचे मराठी यात बराच फरक असला तरी ते मराठीच ठरते. कारण मराठीतील स्थिरतत्वे मराठीला बदलप्राप्ततेची सिमारेषा आपोआप आखून देतात. त्यामुळेच अहिराणी, कोल्हापूरी, खानदेशी, वर्‍हाडी, अशा मराठीच्या बर्‍याच बोली असल्या तरी त्या सर्वांची भाषा मराठीच ठरते. प्रत्येक वर्तमानकाळातील आजी-आजोबा, आई-वडील, मुले अशा तीन पिढ्यांतील मराठीत जरी भिन्नता असली तरी ते मराठीच ठरते. यातूनच मराठीची सर्वसमावेशकता सामोरी येते. अशीच सर्वसमावेशकता भाषांच्या जागतिकीकरणात राबवून मानवी भाषांना एकत्रीत आणण्याची किमया केवळ मराठीच करू शकणार आहे. मराठी लिपिला ‘मराठमोळी’ नाव दिल्याने केवळ मराठीलाच नव्हे तर एकूण मानवाच्या भाषा-विज्ञानाला फायदा होणार आहे. इंग्रजांच्या काळात मराठी भाषा ‘अॅ’ व ‘ऑ’ स्वर असलेले अनेक शब्द वापरू लागली. अॅडव्होकेट, अॅगल, कॅन, मॅट, बॅट, बॉल, ऑडिट, ऑफिस, . . असे असंख्य शब्द मराठीत सर्रास वापरले जातात. व्याकरणकारांनी सांगितले म्हणून हे शब्द मराठीत वापरले जात नाहीत. आता ते मराठीत वापरले जातात म्हणून ते मराठीचे झाले आहेत. मराठीला ‘अॅ’ व ‘ऑ’ स्वर स्विकारता आले पण गुजराती व हिन्दी ‘अॅ’ व ‘ऑ’ स्वर नीटपणे स्विकारता अजूनही आले नाहीत. संस्कृतला तर ते कधीच स्विकारता येणार नाहीत. मराठीला नवे मराठी शब्द जसे सहजपणे स्विकारता आले तसेच ‘अॅ’ व ‘ऑ’ स्वर स्विकारता आले. व्याकरणाने ‘अॅ’ व ‘ऑ’ अधिकृतपणे स्विकारणे हा विषय मराठीत अस्तीत्वातच येत नाही कारण मराठीसाठी ‘व्याकरण म्हणजे भाषेत काय, कसे, कुठे, किती आहे ते सांगणे होय’. व्याकरणाला आजच्या मराठीचा आढावा घेताना यांची नोंद करावीच लागेल.

अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.

No comments:

Post a Comment