Tuesday, 7 January 2014

जाणिवजनक - भाग 4



जाणिवजनक - भाग 4

भाषांच्या जागतिकीकरणात मराठी भाषा सर्वसमावेशक का बरे ठरेल? इंग्रजी भाषेला तो गौरव का बरे मिळणार नाही?
अत्याधुनिक सायन्स ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे’ असा प्रवास करते. फिजिक्स मध्ये आपण अणू-रेणू शोधले आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण कॉण्टम पर्यंतची सुक्ष्मता गाठली, तेव्हा मानवाच्या विकासाचा मार्ग खुला झाला. मानवाने चंद्र आणि इतर ग्रहांवरची झेपही प्रत्यक्षात आणली. या सर्व विज्ञानाचा प्रवास मुख्यत्वे करून इंग्रजी व युरोपीयन भाषांतून झाला. पण भाषेतील सर्वात सुक्ष्म भाग मात्र इंग्रजी व युरोपीयन भाषांना शोधून, आत्मसात करून आचरणात आणता आला नाही. याचे महत्त्वाचे कारण ‘इंग्रजी व युरोपीयन भाषांनाच मुळात ‘ध्वनीची भाषीक शास्त्रीयता’ समजणार नाही’, हे आहे. मानवी भाषेतील सर्वात सुक्ष्मभाग मराठीतील व्यंजन-स्वर ठरतात. भाषांच्या जागतिकीकरणात मराठी भाषा सर्वसमावेशक ठरेल कारण ध्वनीच्या सर्वात सुक्ष्म भागाच्या वापरातून मराठीचे अस्तित्व निर्माण झालेले आहे.

‘मानवी भाषेतील सर्वात सुक्ष्म व्यंजन मराठीतील ठरतात’, हे विधान स्पष्ट कराल का?
मानवी भाषा ध्वनीवर आधारीत आहेत. ‘भाषा-ध्वनीचा सर्वात सुक्ष्म भाग’ याची अचूक, निश्चित आणि शास्त्रीय व्याख्या शोधण्यासाठी आपल्याला  ‘मुखातून निर्मित होणारा उच्चार-ध्वनी’ आणि ‘ऐकू येणारा ध्वनी’ यांचा विचार करावा लागतो. म्हणजेच व्यंजन वा स्वर यांचा ‘उच्चार-ध्वनी’ आणि ‘श्राव्य-ध्वनी’ दोन्ही सुक्ष्म असणे गरजेचे आहे.
आपण ‘सुक्ष्म-ध्वनी’ याची व्याख्या करू. वाक्यात शब्द असतात. मराठी शब्दाची फोड केली की त्यातील अक्षरांची ओळख होते. अक्षरांची फोड केली की त्यातील व्यंजन-स्वर यांची ओळख होते. व्यंजन व स्वर यांची फोड करता आली नाही तर ते सुक्ष्म ठरतात.
जसे वस्तुमानातील सुक्ष्म घटक रेणु ठरतो. रेणुची फोड केली की विज्ञानातील सर्वात सुक्ष्म घटक अणु मिळतो. उदाहरण – पाणी याच्या रेणुची ओळख H2O अशी असून त्यातील अणुंची ओळख H2 आणि O2 अशी आहे.
तसेच ‘अक्षर’ याची फोड केली की ‘व्यंजन’ व ‘स्वर’ सापडतात. मराठी ‘अक्षर’ हे रेणू आणि ‘व्यंजन-स्वर’ हे अणु ठरतात.
‘मराठी व्यंजन-स्वर यांची फोड करता येत नाही’ या विधानातील ‘फोड करता येत नाही’ म्हणजे नक्की काय करता येत नाही ते पाहू.
त्यासाठी ‘जातीगुणवैशिष्ट्य’ या शब्दाच्या व्याख्येची ओळख आपण करून घेऊ. व्यंजनाचा उच्चार क्षणभर टिकतो. क्षणभर टिकणे म्हणजे सुक्ष्मपणा नव्हे. त्या क्षणभर टिकणार्‍या ध्वनीतील जातीगुणवैशिष्ट्य केवळ एकच असणे म्हणजेच त्याची फोड करता येत नाही, असे म्हणता येते. ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ हा गुणधर्म केवळ ऐकून ओळखता येतो. ‘व्, प्, न्, ड्’ वगैरे व्यंजनातील जातीगुणवैशिष्ट्य भिन्न आणि प्रत्येकी केवळ एकच असते. ‘व्यंजने क्षणभर टिकतात’ यातील ‘क्षणभर टिकणे’ ही जर व्यंजनांची ओळख ठरत असती तर सर्व व्यंजने समान ठरली असती. कोणत्याही व्यंजनाचा उच्चार कोणत्याही फ्रिक्वेन्सीत वा लाऊडनेस मध्ये करता येतो. म्हणजे ध्वनीची फ्रिक्वेन्सी वा लाऊडनेस ही व्यंजनांची ओळख ठरत नाही. ‘फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस व उच्चारातील वेळ’ याशिवाय भाषा-ध्वनीत असलेल्या ‘जातीगुणवैशिष्ट्य’ या गुणधर्मातून व्यंजनांची ओळख भाषेला होते.
मराठी व्यंजनांची आटोपशीर अचूक व्याख्या – उच्चाराच्या वेळी एकाच आघातातून ज्यांची निर्मिती होते आणि ज्यांतून केवळ एकच एकमेव जातीगुणवैशिष्ट्य ऐकू येते त्याला मराठीने व्यंजन मानले आहे.
मराठी आणि संस्कृत व्यंजनातील फरक – मराठीत ‘चमचा’ मधील ‘च’ व्यंजन आहे. संस्कृत मध्ये ‘चाणक्या’तील ‘च’ (च्य उच्चाराचे) व्यंजन आहे. संस्कृत मधील ‘च’ (च्य) यात सुरवातीला ‘चमचा’ मधील ‘च’ आणि शेवटी ‘ययाती’ मधील ‘य’ सदृष्य ध्वनी असतो. म्हणजेच संस्कृतच्या व्यंजनाची फोड करता येते. इंग्रजी भाषेनेही ‘च्य’ हाच उच्चार स्विकारला आहे. इंग्रजी त्यासाठी ch अशी दोन लेटर्स वापरते. इंग्रजी डिक्शनरीतील Symbol Spelling यातून ‘c’ या एकाच लेटरने कोणत्याही उच्चाराची ओळख दिलेली नाही. इंग्रजीने ‘c’ला व्यंजन मानले आहे पण त्या चिन्हातून एकच ठराविक उच्चाराची नेमणूक इंग्रजीला ठरवता आलेली नाही.
मराठीने सर्वात सुक्ष्म ध्वनीची नेमणूक व्यंजन म्हणून केलेली असल्याने मराठीला ‘जोडाक्षर’ याची निश्चित व्याख्या करून जगभरच्या कोणत्याही भाषेला लावता येते. संस्कृतने ‘च्य’ या जोडाक्षरालाच व्यंजन मानल्याने संस्कृतला ‘जोडाक्षर’ याची सर्व मानवी भाषांना देता येईल अशी रचना मांडता आलेली नाही. ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे’ हा मराठीचा प्रवास भाषांच्या जागतिकीकरणात मराठीला सर्वसमावेशकाची भुमिका प्रदान करते.
घंटेचा टोल हा आघातातून निर्माण होतो त्याचप्रमाणे व्यंजने ‘स्पर्श, अंतस्थ, उष्मे, महाप्राण, घर्षण’ अशा वर्णनातून व्यक्त करता येणार्‍या आघातातून निर्माण होतात. घंटेचे व त्यातील लंबकाचे ‘वजन, आकार, धातु’ अशांमुळे ‘टोल’ यातून निर्माण होणारा ‘नाद, आवाज, ध्वनी’ याची पोत-गुण-जात-वैशिष्ट बदलते. तसेच मुखाच्या कोणत्या भागातून व्यंजन निर्माण होते त्यावर त्यातील जातीगुणवैशिष्ट्य अवलंबून असते. ‘कोमल तालु, मध्य तालु, कठोर तालु, दंत तालु, दात, ओठ’ अशा ‘टणक वा मृदू’पणात भिन्नता असलेल्या ठिकाणांवर जिभेने आघात केला की ध्वनीतील भिन्न जातीगुणवैशिष्ट्य निर्माण होते.
आता आपण स्वरांच्या निर्मितीबाबत बोलू. बासरीच्या भिन्न भोकांवर बोटे ठेऊन अडसर निर्माण झाला की बाहेर पडणारी हवा भिन्न सूर उमटविते. काहीसे त्याचप्रमाणे मुखातून बाहेर पडणार्‍या हवेच्या प्रवाहात जिभेचा अडसर निर्माण झाला की स्वर उमटतो. हा जिभेचा अडसर निर्माण करताना मुखाचे आडवे तीन व उभे तीन असे भाग मराठीने स्वर निर्मितीसाठी ठरवले आहेत. जिभेच्या अशा आठ भिन्न अवस्थेतून मराठीतील स्वर निर्माण होतात. मुखाच्या गाभार्‍यातील जिभेच्या भिन्न स्थितीतून स्वरांची निर्मिती होते. मराठीने केवळ जिभेच्या स्थितीवर स्वरांची निर्मिती स्थळे मानली आहेत. संस्कृतने मात्र स्वरांची निर्मिती स्थाने कंठ (अ, आ), तालु (इ, ई), मूर्धन् (ऋ, ॠ), दन्त (लृ), ओष्ठ (उ, ऊ), कंठ-तालु (ए, ऐ), दंत-तालु (ओ, औ) अशी मानली आहेत. मराठी आणि संस्कृत भाषा भिन्न, तटस्थ व स्वतंत्र आहेत. जरी दोन्ही भाषा देवनागरी चिन्हांतून वावरत असल्या तरी त्यांची ‘व्यंजन-स्वर’ एवढेव कशाला ‘अक्षर’ ही संकल्पनाही पूर्णपणे वेगळ्या आहेत.
मराठीने स्वतःच्या लिपीचे नाव ‘मराठमोळी’ असे घोषीत केल्याने त्यातील फरक सहजतेने मांडता, दाखवता आणि शिकवता येणार आहे. त्यामुळे मराठीला भिन्न, तटस्थ, स्वतंत्र, स्वावलंबी आणि शास्त्रीय भाषा म्हणून स्थान मिळणार आहे.

अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.

1 comment: