Tuesday, 7 January 2014

जाणिवजनक - भाग 3



जाणिवजनक - भाग 3

मानवाने स्वतःच्या भाषा निर्माण करता येतात तशा इतर प्राण्यांना का जमत नाही?
प्राणी आणि मानव यातील महत्त्वाचा फरक कोणता?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण ‘जाणीवा’ या शब्दातील अर्थाचा आधार घेऊ आणि थोडक्यात पण मुद्देसुदपणे सजीव आणि निर्जीव यांच्या व्याख्येपासून सुरवात करू. ‘जन्म, संगोपन, वाढ, वृद्धी आणि मरण’ या सजीवतेच्या महत्त्वाच्या खुणा आहेत. या दृष्टीने ‘वृक्ष’ आणि ‘प्राणी’ दोन्ही सजीव ठरतात. यांच्या सजीवतेतील फरक आटोपशीरपणे व्याख्या स्वरूपात मांडता येतो. ज्यांना ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर’ या षड् रिपूंची बाधा आहे त्यांना प्राणी म्हणतात. प्राण्याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत या षड् रिपूंची बाधा अबाधीत राहते. ‘हृदयाचे ठोके थांबले’, ‘श्चास थांबला’ म्हणजे शरीराचा मृत्यु होतो. षड् रिपूंची बाधा नाहीशी झाली तर ‘प्राणीपणाचा’ मृत्यु होतो व अशा शिल्लक राहीलेल्या शरीराला ‘वृक्ष’ म्हणता येईल! प्राणी आणि मानव यातील फरक ‘जाणीवा’ या शब्दातील अर्थाचा आधार घेऊन निश्चित व ठोसपणे मांडता येतो. ज्या प्राण्याला षड् रिपूंबाबतचा संवाद ‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ यांच्या वापरातून आदानप्रदान करता येतो त्याला मानव म्हणतात.

वैद्यकीय पद्धतीतून आजवर प्राणी, मनुष्य यांच्या व्याख्या तुम्ही ऐकल्या असतील. आजप्रथम ‘भाषा’ या विचाराच्या अनुषंगाने नव्या व्याख्या सादर करत आहे. अर्थात त्यावर विचार करून मगच त्या मान्य करा. मी लिहीलेल्या मराठीच्या अत्याधुनिक व्यवस्थापनेचा (व्याकरणाचा) हा महत्त्वाचा भाग ठरतो. ‘भाषांच्या जागतिकीकरणात मराठी भाषा जगाला स्विकारायला लागणार आहे’, कारण ती ‘मानव’ या दृष्टीकोनाचा निखळ पाठपुरावा करणारी सर्वाधीक नैसर्गिक आहे.

‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ यांचा संबंध ‘मानव’ याच्याशी का आणि कसा जोडला जातो? हा संबंध केवळ ‘मराठी’पुरताच मर्यादीत का ठरत नाही?
‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ यांची ‘मराठमोळी’ व्याख्या नीट समजून घेतली की याचा प्रत्यय, परिचय व प्रचिती कळेल. आजवर मराठीची अशी ओळख व्याकरणाने करून दिली नाही. प्रत्येक मानवी भाषेने आत्मसात केलेले ‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ भिन्न स्वरूपाचे आहेत. निसर्ग मानवाला जे देऊ शकतो त्याचा जास्तीतजास्त उपयोग करून ‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ हे निसर्गदत्त भाग, भाषेने कसे आत्मसात केले आहेत, यावर त्या भाषेची ‘भाषीक-क्षेष्ठता’ आणि ‘मानवी भाषांबाबतची सर्वसमावेशकता’ ठरत असते. ‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ या संकल्पना मानवाने निर्माण केलेल्या नाहीत. त्या निसर्गाने मानवावर लादलेल्या आहेत. ‘उच्चार-करता-येणे’ आणि ‘ऐकून-उमगणे’ या गोष्टी नैसर्गिक ठरतात पण ‘कोणते-किती-कसे-काय’ उच्चार भाषेने स्विकारले आहेत यावर मानवी मेंदूतील भाषा-केंद्रावर त्याचे परिणाम होतात.
उदाहरण – जिभेला हाड नसते. जिभ कशीही वळू शकते. सर्व मानवांच्या जिभेची जडणघडण सारखी असते. मराठीला इंग्रजांच्या काळात ‘अॅ’ व ‘ऑ’ स्विकारता आले पण तसेच उच्चार गुजराती, हिन्दी, संस्कृत, . . . वगैरेंना ‘उच्चारात अणि भाषेत’ स्विकारता आले नाहीत.

‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ यांची ‘मराठमोळी’ व्याख्या म्हणजे नक्की काय?
आजवर मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरता विचार करून व्याकरण लिहीले गेले नाही. मराठीला बदलण्याचा अधिकार मराठीने कोणालाही दिलेला नाही. व्याकरण म्हणजे भाषेत काय, कसे, किती व कुठे आहे ते सांगणे होय. मराठीचे मूलभूत, उपजत आणि शास्त्रीय व्यवस्थापन कसे आहे?, ते अत्याधुनिकपणे मांडून ते ‘मराठमोळी’ लिपी या नावाने सादर करत आहे. ‘देवनागरी लिपी’ असा उल्लेख करून त्यातून ‘संस्कृत, हिन्दी व मराठी’ भाषा आजवर वावरल्या. मराठीने देवनागरी चिन्हांचाच वापर याही पुढे करावा पण मराठीतील ‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ यांची जडणघडण ‘संस्कृत व हिन्दी’ भाषांपेक्षा कशी भिन्न आहे ते निश्चितपणे मांडण्यासाठी लिपीचे नाव ‘मराठमोळी’ असे घेणे अत्यंत गरजेचे आहे. ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन व अर्थ’ यांचा संगम म्हणजे मराठी लिपी होय. ‘मराठमोळी’ असे लिपीचे नाव घेतल्यावर मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरता विचार करून ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन व अर्थ’ यांच्या अचूक ‘मराठमोळ्या’ व्याख्या मांडता येतात. यातून मराठी ही तटस्थ, स्वतंत्र, स्वावलंबी आणि शास्त्रीय भाषा असल्याचे पुस्तकी-स्वरूपातून जगापुढे मांडले जाईल. यातून जगाला भाषा-विज्ञानाची नवी अत्याधुनिक शास्त्रीय विचारसरणी मिळणार आहे.

‘मराठमोळी’ हा नवीन शब्द प्रयोग मांडून तुम्ही मराठीला वेगळी दिशा देत आहात पण आजवरच्या थोर, मान्यवर, प्रतिष्ठित भाषा-तज्ञांनी हे का मांडले नाही?
भाषेचे व्याकरण ती भाषा वापरणार्‍या प्रत्येक व्यक्तिच्या उच्चारातून सादर होते. आपण बोलतो त्यातच व्याकरण असते. याला आपण ‘बोली-व्याकरण’ म्हणू. मराठीचे असे बोली-व्याकरण मूलभूत, उपजत आहे. आजचे ‘पुस्तकी-मराठी-व्याकरण’ आणि ‘बोली-मराठी-व्याकरण’ यात प्रचंड फरक आहे. एका बाजूला संस्कृतचे आणि दूसर्‍या बाजूला इंग्रजीचे व्याकरण ठेऊन मराठीचे व्याकरण थोर, मान्यवर, प्रतिष्ठित भाषा-तज्ञांनी लिहीले. मराठीला पुस्तकी व्याकरणाची गरज भासली नव्हती. मराठीच्या पुस्तकी व्याकरणाची गरज भासली ती इंग्रजांना, त्यांचा राज्यकारभार नीट चालावा यासाठी! पहीले मराठीचे पुस्तकी व्याकरण सर कॅरी नावाच्या इंग्रजी अधिकार्‍याने लिहीले हा इतिहास आहे. ‘मराठमोळी’ लिपीचा स्विकार करून मांडत असलेल्या मूलभूत, उपजत, अत्याधुनिक आणि शास्त्रीय व्याकरणाच्या तपासणीसाठी कोणत्याही पुस्तकाची, ग्रंथाची गरज नाही. मराठी व्यक्तिच्या ‘स्वरयंत्र ते ओठ’ या निसर्गदत्त प्रयोगशाळेचा वापर करून यातील योग्यता व अचूकता तपासता येते.

‘मराठमोळी’ लिपी स्विकारल्याने महत्त्वाचे असे काय घडणार आहे?
आजवर मराठीतील ‘वाक्य, शब्द, अक्षर, व्यंजन, स्वर’ यांच्यात तृटी आहेत असे व्याकरणातून सांगितले जाते. व्याकरणात आणि शुद्धलेखन नियमावलीत मराठीची मराठीतच ‘तत्सम’ आणि ‘तत्भव’ अशी फाळणी केली गेली. याचे कारण संस्कृतच्या व्याकरणाला आधारभूत मानत त्यातील जास्तीतजास्त भाग मराठीत ‘तत्सम’ नावाने स्विकारला गेला आणि उरलेला भाग ‘तत्भव’ समजला गेला. प्रत्येक भाषा स्वतंत्र असते तरच तिला भाषा म्हणतात, हे महत्त्वाचे तत्व व्याकरणकार विसरले. दुसर्‍या भाषेचे (संस्कृतचे) व्याकरण मराठीला चिटकवून त्यांनी त्यांचे अज्ञान लपवले. आता हे सारे सहजतेने सुधारता येणार आहे. त्यामुळे ‘बोली-व्याकरण’ व ‘पुस्तकी-व्याकरण’ यातील फरक नेस्तनाबूत होईल. मराठीला स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभिमानाने वावरता येईल. संस्कृत भाषा भारतीयांचा आत्मसन्मान ठरतो. पण याचा अर्थ संस्कृतने मराठीवर भाषीक अत्याचार करावेत असा होत नाही. कोणतीही भाषा दुसर्‍या भाषेवर अत्याचार करत नाही. संस्कृतचे व्याकरण मराठीला जोडण्याची चूक मराठी व्याकरणकारांनी केली. आता ती दुरुस्त करण्यासाठी ‘मराठमोळी’ लिपीचा स्विकार प्रथम करणे अत्यावश्यक ठरते.

अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.

आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com वेबसाईट -

No comments:

Post a Comment