Tuesday, 7 January 2014

जाणिवजनक - भाग 2



जाणिवजनक - भाग 2

वाक्य म्हणजे नक्की काय?
मानवी भाषेतील वाक्य म्हणजे न्युटनचा ‘क्रिया तेथे प्रतिक्रिया’ हा नैसर्गिक सिद्धांत होय. यातून तीन प्राथमिक महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात, 1) यात क्रिया करणारा कोण? 2) प्रतिक्रिया व्यक्त करणारा कोण? 3) ‘क्रिया करणारा’ आणि ‘प्रतिक्रिया व्यक्त करणारा’ यात नेमकी कोणती क्रिया घडली?. या तिन्ही प्रश्नांची प्रत्येकाच्या मनातली नैसर्गिक जडणघडण म्हणजे वाक्य. त्यामुळेच जगातील कोणत्याही भाषेतील वाक्यात ‘कर्ता, कर्म व क्रियापद’ असते. 

‘वाक्य’ याची जडणघडण जर नैसर्गिक असली तर मग प्रत्येक भाषेतील वाक्याची जडणघडण भिन्न कशी?
समजा जर दोन गोष्टी एकमेकावर आदळल्या तर त्यातील टक्कर देणारा कोण? आणि ती टक्कर सोसणारा कोण? अशा प्रश्नांना निश्चित असे उत्तर नसते. दोघांपैकी कोणीही कर्ता वा क्रम असू शकतो. त्यामुळे ‘मारले रामुने महादूला’, ‘रामुने महादूला मारले’,  ‘महादूला रामुने मारले’ अशी वाक्ये आपण बोलताना म्हटली तरी त्या सार्‍या वाक्यांचा अर्थ जवळजवळ समान होतो.

या उत्तरात तुम्ही ‘जवळजवळ समान’ असे का म्हटले आहे?
आपल्याला जे दर्शवायचे आहे ती गोष्ट आपण ‘समोर प्रथम पटकन दिसेल’ याकडे लक्ष देतो. तसेच ‘मारले’, ‘रामु’ वा ‘महादू’ यापैकी संवादात आपल्याला जास्त भर कशावर द्यायचा आहे? यावर आपण बोलताना तो शब्द प्रथम वापरतो. पण मराठीने लेखनात मात्र ‘कर्ता, क्रर्म क्रियापद’ हा क्रम ठेवला आहे.

‘कर्ता, क्रर्म क्रियापद’ हा क्रम लेखनात न पाळणार्‍या भाषा आहेत का?
हो बर्‍याच आहेत. आपल्याला नक्की माहीत असलेल्या, संस्कृत भाषेतील लेखनात हा क्रम पाळण्याची गरज नसते, म्हणून तो पाळण्याची सक्ती केलेली नाही.

तुम्ही ‘संस्कृत भाषेतील लेखनात ‘कर्ता, क्रर्म क्रियापद’ हा क्रम पाळण्याची गरज नसते’ असे का म्हटले?
समजा मराठीत आपण बोलताना वरील वाक्यात ‘मारले’ शब्द प्रथम आणायचा म्हटले तर ‘मारले रामुने महादूला’ असे वाक्य होते. यात ‘रामु’ शब्दाला ‘ने’ आणि ‘महादू’ शब्दाला ‘ला’ जोडावे लागते. यातील ‘ने’ (तृतीयेचे एकवचन) आणि ‘ला’ (चतुर्थीचे एकवचन) यांना ‘प्रत्यय’ म्हणतात. मराठीतील शब्द पुल्लींगी, स्त्रीलिंगी वा नपुसकलिंगी असला तरी त्यांचे प्रत्यय समान राहतात. संस्कृतमध्ये मात्र तसे नाही प्रत्येक पुल्लींगी, स्त्रीलिंगी वा नपुसकलिंगी शब्दाला लागणारा प्रत्यय नक्की ठरलेला व भिन्न असतो. त्यामुळे संस्कृत मधील निव्वळ शब्द प्रत्यय लावून ‘चालवून’ व ‘घोकून’ आत्मसात करून प्रत्ययातील निश्चित अर्थापर्यंत आधिच पोचलेला असतो. संस्कृत मध्ये पदांना (शब्दांना) पुल्लींग, स्त्रीलिंग वा नपुसकलिंग प्रदान करण्याचा निश्चित नियम आहे. ‘X’ म्हणजे असा शब्द संस्कृतमध्ये नसतो.
शब्दातील शेवटचा स्वर ----- पुल्लिंग ----  स्त्रीलिंग ----  नपुसकलिंग      
अ ------------------------------ राम ---------- X ---------- वन 
आ ------------------------------ X ---------- शाला ---------- X
इ ------------------------------ कवि -------- मति --------- वारि
ई ------------------------------- X ---------- नदी ----------- X
उ ------------------------------ गुरु --------- धेनु ---------- मधु 
ऊ -----------------------------  X ----------- वधू ----------- X
ऋ ----------------------------- कर्तृ --------- स्वसृ -------- कर्तृ 
म्हणजेच ‘गोविंद’ म्हटले तर संस्कृत मध्ये तो पुरुष ठरतो पण जर ‘गोविंदा’ म्हटले तर तो स्त्री ठरतो. मराठीत असे काही नसते. मराठीत केवळ एकवचन व अनेकवचन अशी दोन वचने आहेत. संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन व बहूवचन अशी तीन वचने आहेत. संस्कृत शब्द (पद) वाक्यात ‘कर्ता, क्रर्म क्रियापद’ यापैकी कोणत्याही अनुक्रमाने वापरला तरी अर्थ तसाच राहतो. त्यात ‘अर्थाच्या अनुषंगाने जास्त भर देणारा शब्द पहिला यावा’ वगैरे काहीही नसते. उदाहरण – ‘रामः दुग्धं पिबति ।’, ‘दुग्धं रामः पिबति ।’, वा ‘पिबति रामः दुग्धं ।’ असे कसेही लिहीले वा बोलले तरी चालते. मराठीत एकवचन व अनेकवचन यांना जोडले जाणारे अनेक प्रत्यय समान आहेत. ‘स, ला, ते’ हे द्वितीयेचे व चतुर्थीचे प्रत्यय, ‘शी’ हा तृतीयेचा प्रत्यय, ‘ऊन, हून’ हे पंचमीचे प्रत्यय, ‘चा, ची, चे’ हे षष्ठीचे प्रत्यय, ‘त, ई, आ’ हे सप्तमीचे प्रत्यय मराठीत एकवचन व अनेकवचन या दोघांनाही जोडले जातात. प्रत्येक भाषेतून साकारणारा आणि अभिप्रेत अर्थापर्यंत संवादातून पोचविणारा असा निश्चित पायंडा असतो.

तुम्ही ‘प्रत्येक भाषेतून साकारणारा आणि अभिप्रेत अर्थापर्यंत संवादातून पोचविणारा असा निश्चित पायंडा असतो’ असे म्हणालात, याचे जास्त मराठी भाषेसाठीचे स्पष्टीकरण मिळेल का?
‘रामु स्टेशनवर गेला’ हे वाक्य जर बोलून दाखवले तर त्या शब्दांच्या एकाच क्रमातून, म्हणजे कर्ता-कर्म=क्रियापद या क्रमाने, साकारलेल्या वाक्यातून सुद्धा आपण अभिप्रेत अर्थापर्यंत पोचू शकतो. समजा ‘रामु’ स्टेशनवर जाणार नव्हता तर तोच वाक्य उच्चारातून ‘रामु (?) स्टेशनवर गेला’ असे ‘रामु’ शब्दाचा उच्चार प्रश्नचिन्ह दिल्यासारखा करून व्यक्त करता येतो. तसेच ‘रामु स्टेशनवर (?) गेला’ यातून ‘खरे म्हटले तर तो स्टेशनवर जाणार नव्हता’ असे सुचवले जाते. तर ‘रामु स्टेशनवर गेला (?)’ यातून ‘रामु स्टेशनवर आत्ताच जाणार नव्हता’ असे सुचवले जाते. वाक्याच्या उच्चारातून शब्द आणि अक्षर यांना जोडल्या जाणार्‍या उच्च-नीचता (Frequency), लहान-मोठेपणा (Loudness) आणि कालमापन (Duration of time) यातून आपण संवादातून अभिप्रेत अर्थापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो.

Frequency ला तुम्ही उच्च-नीचता का म्हणता? त्याला ‘वारंवारीता’ असा शब्द मराठीत आहे ना?, Loudness ला तुम्ही लहान-मोठेपणा का म्हणता? त्याला ‘महत्ता’ असा शब्द मराठीत आहे ना?
उच्चारीत ध्वनीची वारंवारीता (Frequency) 85 ते 1100 असते. ध्वनीची महत्ता (Loudness) मोजण्याचे प्रमाण डेसीबल (decibel) आहे. मानवाला 20 ते 60 डेसीबल (decibel) चा ध्वनी उच्चारता येतो. जर 50 डेसीबल (decibel) च्या ध्वनीची महत्ता (Loudness) म्हणजे ध्वनी-उर्जेची ताकद विचारात घेतली तर 40 डेसीबल (decibel) च्या ध्वनीपेक्षा तो दहा पटीने मोठा असतो. तुम्ही एखादे वाक्य बोललात तर ते किती वारंवारीतेत (Frequency त) आहे आणि तसेच ते कोणत्या डेसीबल (decibel) मध्ये आहे ते कोणालाही सांगता येत नाही. मालक आणि नोकर यातील संवादात ‘मालकाचा आवाज उच्च’ आणि ‘नोकराचा आवाज नीच’ असे भाषेतून केवळ वारंवारीता (Frequency) तेच्या तुलनात्मक फरकातून व्यक्त करता येते. तसेच ‘मालकाचा आवाज मोठा’ आणि ‘नोकराचा आवाज लहान’ असे भाषेतून केवळ महत्ता (Loudness) तेच्या तुलनात्मक फरकातून व्यक्त करता येते. यामुळे भाषा-ध्वनीसाठी Frequency या गुणधर्माची ओळख उच्च-नीचता आणि Loudness या गुणधर्माची ओळख लहान-मोठेपणा अशी करून देणे अचूक व शास्त्रीय ठरते.

अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.
तेथे ‘मराठी भाषा’, ‘मानवी भाषांचे जागतिकीकरण’ आणि ‘संगणक ते जाणिवजनक’ याबाबतचे कोणतेही प्रश्न विचारा. त्यांचे उत्तर दिले जाईल आणि त्यावर चर्चा होईल. फेसबुकवरील चर्चा आटोपशीर, साध्यासोप्या शब्दातून घडत असल्याने बरेच मुद्ये जर अतृप्त राहीले असे वाटले तर त्याबाबत विचारणा करा. राहिलेले मुद्दे मनमोकळ्या चर्चेतून ठळकपणे सामोरे येतील आणि त्यांना योग्य उत्तरे दिली जातील. यातून मराठीची मराठीची अद्वितीयता आणि सर्वसमावेशकता जगापुढे सामोरी येईल.

आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com वेबसाईट -

No comments:

Post a Comment