Tuesday, 7 January 2014

जाणिवजनक - भाग 10



जाणिवजनक - भाग 10

मागील लेखांतून आपण ‘उच्चार’ या विभागातील ‘शाश्वत-गृहीत-1 = भाषेत वापरले जाणारे उच्चार, ‘वेदना न देणार्‍या’ व ‘सर्वाना सहजतेने मुखातून निर्माण करता येणार्‍या’, ध्वनीच्या गुणधर्मांवर आधारीत असावेत’ याबाबत मराठीने स्विकारलेल्या ‘तरतुदी’ आपण मागील काही लेखांतून पाहिल्या त्यात ‘तरतुद-1.1, तरतुद-1.2, तरतुद-1.3 आणि तरतुद-1.4’ हे भाग होते. आता आपण चर्चा पुढे नेऊ.

तरतुद-1.5 = ‘अक्षर’ ही संकल्पना निसर्गाने मानवावर लादली आहे. ‘अक्षर’ या नैसर्गिक संकल्पनेची जाणिव मानवी भाषांना तुटपुंजी, काहीशी, थोडीशी, बरीचशी झालेली आढळते. पण केवळ मराठी भाषेला निसर्ग मानवाला जे जास्तीतजास्त उपयोग क्षमतेतून देऊ शकतो ते घेता आले आहे.

मराठीच्या आजवरच्या पुस्तकी व्याकरणात असे काहीही दिलेले नाही, हे येथे प्रथम नमूद करणे गरजेचे आहे. मराठीला बदलण्याचा अधिकार मराठीने कोणालाही दिलेला नाही. पण आजवरच्या पुस्तकी व्याकरणाने संस्कृतचे व्याकरण मराठीला लावण्याचा प्रयत्न करून मराठीला बदलण्याचा प्रयत्न केला. पाणिनी हे संस्कृतचे नावाजलेले मान्यवर व्याकरणकार आहेत. त्यांनी जे मांडले ते केवळ, निव्वळ आणि फक्त संस्कृतपुरतेच मर्यादीत राहते याची जाणीवही व्याकरणकारांना नाही. मराठीचा मराठीपणातून मराठीसाठी मराठीपुरता विचार करणे म्हणजे संस्कृतचा दुःस्वास करणे नव्हे. हे कृपया लक्षात घ्यावे. संस्कृत भाषेची बांधणी प्रचंड अनैसर्गिकपणावर आधारलेली आहे आणि मराठी सर्वात जास्त नैसर्गिक असल्याने मुक्त, स्वच्छंद, ओघवती, आधुनिक आणि शास्त्रीय आहे.

‘अक्षर’ या संकल्पनेची गरज मानवी भाषांना पडते कारण निसर्गाने मानवावर, ‘व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय करता येत नाही’, हा नियम लादला आहे. मराठीतील ‘अक्षर’ व्यंजनाला त्यानंतर स्वर जोडून बनते. मराठीतील अक्षर आणि संस्कृतमधील ‘अक्षर’ यात खूप फरक आहे.
‘नैसर्गिकपणातून साकारणारा ध्वनी’ कसा निर्माण होतो आणि चराचरातून वावरतो, ते आपण मागच्या लेखात पाहीले. यालेखात प्रथम आपण त्यातील ‘स्फोट-ध्वनी’ व मानवी भाषेतील ‘व्यंजन’ यांच्याबाबत महत्त्वाची ‘तुलना व साम्यस्थळे’ आपण तपासू.

1)    स्फोट-ध्वनी व व्यंजने - - - केवळ क्षणभर टिकतात कारण ते आघातातून निर्माण होतात आणि या क्षणभरापुरतीच त्यांची ऐकून जाणीव होते. उदाहरण – घंटेचा टोल आणि मराठीतील ‘प, का, जु, . .’ अशा कोणत्याही अक्षरातील ‘प्, क्, ज, . .’ अशी सर्व व्यंजने क्षणभरच टिकतात.

2)    स्फोट-ध्वनी व व्यंजने - - - यांच्या निर्मितीच्या वेळी आघातात भाग घेणार्‍या गोष्टींच्या, ‘टणक, नाजूक, ठिसुळ, घनता, . . . वगैरे गुणधर्मांमुळे’ त्यातून निर्माण होणार्‍या ध्वनीतील जातीगुणवैशिष्ट्य भिन्न ठरते. उदाहरण – घंटा जर लोखंडी, पितळी, स्टील अशा भिन्न धातुंची असली वा त्याचे आकारमान लहान-मोठे असले वा त्याची जाडी कमी-अधिक असली तर त्यातून निर्माण होणारा क्षणीक ध्वनी भिन्न असतो. व्यंजनाच्या निर्मितीतला आघात जर ‘कंठ, तालू, मूर्धा, दात, ओठ’ अशा भिन्न ठिकाणी झाला तर त्यातून निर्माण होणार्‍या व्यंजनातील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ भिन्न असते. त्या ठरविक व्यंजनातील उच्चारासाठी मानवाने कोणतीही फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस वापरला तरी त्यातील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ अबाधीत, निश्चित व कायम राहते.

‘स्फोट-ध्वनी’ व मानवी भाषेतील ‘व्यंजन’ याबाबतचे हे एवढे विवेचन या लेखापुरते योग्य ठरत असल्याने इथेच थांबणे योग्य ठरेल. आता ‘कंप-ध्वनी’ व मानवी भाषेतील ‘स्वर’ यांची तुलना व साम्यस्थळे आपण तपासू. येथे ‘स्वर’ याचा अर्थ ‘व्यंजन-स्वर’ यातील स्वर होय, संगीतातील ‘स्वर’ नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. आता आपण ‘कंप-ध्वनी’ व मानवी भाषेतील ‘स्वर’ यांच्याबाबत महत्त्वाची ‘तुलना व साम्यस्थळे’ तपासू.

1)       ‘कंप-ध्वनी’ व ‘स्वर’ - - - बराच वेळ टिकतात कारण ते कंपनातून निर्माण होतात आणि मानवाला ऐकू येण्याच्या लाऊडनेसच्या क्षमतेपर्यंत बराच वेळ ऐकू येतात. उदाहरण – घंटेतील ‘टोल’ या ध्वनीनंतर ऐकू येणारा घुमणारा नाद मानवाला ऐकू येण्याच्या लाऊडनेसच्या क्षमतेपर्यंत बराच वेळ टिकतो. मानवी भाषेतील ‘अ, आ, इ, उ, ए, . . .’ स्वर श्वास टिकेपर्यंत उच्चारता येतात आणि म्हणून बराच वेळ टिकतात. ‘स्वर’ बराच वेळ टिकत असल्याने गद्य-पद्य-संगीत यातील आलाप-तान-आलाप यातून वापरता येतो.

2)       ‘कंप-ध्वनी’ व ‘स्वर’ - - - यांच्या निर्मितीच्या वेळी कंपनात भाग घेणार्‍या गोष्टींच्या, ‘टणक, नाजूक, ठिसुळ, घनता, . . . वगैरे गुणधर्मांमुळे’ त्यातून निर्माण होणार्‍या ध्वनीतील जातीगुणवैशिष्ट्य भिन्न ठरते. उदाहरण – घंटा जर लोखंडी, पितळी, स्टील अशा भिन्न धातुंची असली वा त्याचे आकारमान लहान-मोठे असले वा त्याची जाडी कमी-अधिक असली तर त्यातून निर्माण होणारा घुमणारा ध्वनी भिन्न असतो. बासरीच्या ठराविक भोकांवर बोटे ठेवली की ठरावीक कंपनांचा ध्वनी निर्माण होतो. ट्युनिंग फोर्क च्या पात्यांची लांबी आणि त्यातील धातु यावर त्यातून निर्माण होणारा कंपीत ध्वनी भिन्न ठरतो. तोंडातील गाभार्‍यातून उच्चारासाठीचा हवेचा ओघ बाहेर पडताना जिभेची स्थिती ‘पुढे-मागे’ वा ‘वर-खाली’ अशा परिसरात ठरावीक असली तर निश्चित, समान व सारखा स्वर मानवाला उच्चारता आणि भाषेतुन वापरता येतो.


आता आपण ‘स्फोट-ध्वनी व व्यंजने’ आणि ‘कंप-ध्वनी व स्वर’ यांच्यातील समान धोरण बघू - - - समान बांधणीच्या वस्तुंतून सारखेपणा जपणारे ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ निर्माण करता येते. उदाहरण – तबल्याचा वा डग्ग्याचा आकार, त्यातील चामडे-शाई-चाती वगैरे रचना अशा समान बांधणीतून समान जातीगुणवैशिष्ट्य निर्माण करून संगीतात वापरता येते. तबला, ठोल, ताशा, वगैरे चर्म-वाद्यातील आघात वेळेपुरता यातील स्फोट-ध्वनी टिकतो, तसेच सतार, गिटार, वीणा, वगैरे तार-वाद्यातील कंप-ध्वनी बराच वेळ टिकतो. या प्रत्येक वाद्यातील स्फोट-ध्वनी व कंप-ध्वनी मानवाला वेगळा असलेला ऐकून कळतो. त्याचवेळी तो ध्वनी ऐकून तो ‘तबला, ठोल, ताशा, सतार, गिटार, वीणा’ यांतील कोणत्या वाद्याचा आहे? ते कळते. ‘कोकिळेची कुहूकुहू, कुत्र्याचे रडणे, बांबूच्या वनातून वाहणार्‍या वार्‍याची मंजूळता, मंदीराच्या गाभार्‍यात घुमणारा आवाज, लता मंगेशकरांच्या गीतातील आलाप, . . . अशा असंख्य ठिकाणी आपण ‘कंप-ध्वनी’च्या अस्तित्वाला ओळखतो.
अशा विविध क्रियांतून साकारलेल्या ‘स्फोट-ध्वनी व व्यंजने’ आणि ‘कंप-ध्वनी व स्वर’ यातल्या ‘जातीगुणवैशिष्टा’तील ‘समान व सारखेपणा’ आणि ‘भिन्नता व फरक’ ओळखतो व जाणतो. मानवातील ‘जातपात, धर्म, रंग, रूप, वयोमान, लिंग-भेद, उंची, जाडी, जवन, स्थळ, ठिकाण, दिवस-रात्र, महिने-वर्ष, उष्णता-थंडी, आराम-कष्ट, थकलेला-तरतरीत, आजारी-सशक्त, . . . अशा कोणत्याही प्रकारात प्रत्येक मानवाने उच्चारलेली ‘व्यंजने व स्वर’ संवादातून देता-घेता येतात आणि ‘व्यंजने व स्वर’ यातल्या ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ समान व सारखेच असल्याचे उमगते.

‘स्फोट-ध्वनी’ आणि ‘कंप-ध्वनी’ हे नैसर्गिक ध्वनीचे सर्वात सुक्ष्म भाग ठरतात. ‘स्फोट-ध्वनी’ आणि ‘कंप-ध्वनी’ हा सिद्धांत मराठी आहे. संस्कृतला ‘स्फोट-ध्वनी’चे ज्ञान अशा प्रकारे झालेले नाही, हे येथे आवर्जून नमूद केले पाहीजे. मराठीने स्विकारलेल्या ‘व्यंजन आणि स्वर’ या ध्वनिंची फोड करता येत नाही इतके ते सर्वात सुक्ष्म ठरतात. मराठीने स्विकारलेल्या ‘व्यंजन आणि स्वर’ यांचा तक्ता ‘शब्दात वापरलेल्या अक्षरातील व्यंजन-स्वर यांच्या उदाहरणासह दिला आहे.


‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ असे ‘व्यंजन व स्वर’ यांचे प्रत्येकी दोन भाग करण्याचा हेतू कोणता? आजवरच्या मराठी व्याकरणातील पुस्तकात मराठी व्यंजन व स्वरांची अशी ओळख करून दिलेली नाही. असे का? याचे उत्तर मिळेल का? ‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ असे विभाग सर्व मानवी भाषांना लागु पडतात का?
होय. ‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ असे विभाग सर्व मानवी भाषांना लागु पडतो. जगाला अत्याधुनिक व शास्त्रीय भाषा-विज्ञान देऊन मराठी भाषा भाषांच्या जागतिकीकरणात महत्त्वाची भूमिका साकार करू शकेल. पुढील लेखात हा भाग चर्चेला घेऊ. त्यासाठीच जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ या ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.

आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com वेबसाईट -

No comments:

Post a Comment