जाणिवजनक - भाग 11
मागील लेखांतून आपण ‘उच्चार’ या विभागातील ‘शाश्वत-गृहीत-1 = भाषेत वापरले
जाणारे उच्चार, ‘वेदना न देणार्या’ व ‘सर्वाना सहजतेने मुखातून निर्माण करता
येणार्या’, ध्वनीच्या गुणधर्मांवर आधारीत असावेत’ याबाबत मराठीने स्विकारलेल्या
‘तरतुदी’ आपण मागील काही लेखांतून पाहिल्या त्यात ‘तरतुद-1.1, तरतुद-1.2,
तरतुद-1.3, तरतुद-1.4
आणि तरतुद-1.5’ हे
भाग होते. आता आपण चर्चा पुढे नेऊ.
तरतुद-1.6 =
‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ असे ‘व्यंजन व स्वर’ यांचे प्रत्येकी दोन भाग करण्याचा हेतू
कोणता? आजवरच्या मराठी व्याकरणातील पुस्तकात मराठी व्यंजन व स्वरांची अशी ओळख करून
दिलेली नाही. असे का? याचे उत्तर मिळेल का? ‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ असे विभाग सर्व
मानवी भाषांना लागु पडतात का?
मराठीच्या आजवरच्या पुस्तकी व्याकरणात असे काहीही दिलेले नाही, हे येथे प्रथम
नमूद करणे गरजेचे आहे. मानवी भाषेने व्यंजन व स्वर कसे वापरावेत याबाबत निसर्गाने
काही निश्चित नियम घालून दिले आहेत. आपण त्यांचा आढावा घेऊ. कोणत्याही मानवी
भाषेसाठी ते लागू पडतात ना ते सर्वांनी तपासून बघावे.
सर्व म्हणजेच प्रत्येक व्यंजनांचा उच्चार क्षणभर टिकतो. उदाहरण – ‘क, पा,, ति,
दु, . . .’ अशा कोणत्याही मराठी अक्षराचा उच्चार पाच, दहा, वीस, वा श्चास
टिकेपर्यंत केल्यास त्यातील अनुक्रमे ‘क्, प्, त्, द्, . . .’ ही उच्चारातील
व्यंजने केवळ क्षणभर आणि समान वेळेपुरतीच टिकतात. अगदी ठरवूनही त्यांचा उच्चार
लांबवता येत नाही. ‘क्षणभर टिकणे’ या व्यंजनांच्या उच्चाराच्या नैसर्गिक नियमावर,
कोणत्याही दोन व्यंजनातील भिन्नतेची ओळख, अवलंबून नसते.
उच्चारीत ध्वनीतील फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस आणि कालमापन यापेक्षा भिन्न असणारा
आणि ऐकून उमगणारा व जाणवणारा ध्वनी गुणधर्म म्हणजे ‘जातीगुणवैशिष्ट्य’ होय. केवळ
या ध्वनी गुणधर्मातून मानवाला उच्चारीत व्यंजनाची जाणीव होते.
त्या उच्चारात वापरल्या गेलेल्या फ्रिक्वेन्सी वा लाऊडनेस या ध्वनी गुणधर्मावरही
व्यंजनांची मानवाला ओळख अवलंबून नसते. उदाहरण – गाण्यातील ‘भेट तुझी माझी स्मरते’
या ओळी संगीतातील मृदू-सप्तकात, मध्यम-सप्तकात वा तार-सप्तकात उच्चारल्या तरी
त्यातील व्यंजनांची ओळख तशीच कायम राहते. संगीतातील सप्तकांसाठी ध्वनीत वापरलेल्या
भिन्न फ्रिक्वेन्सीतूनही व्यंजनांची ओळख कायम राहते. तसेच जरी त्याच ओळी गायकाच्या
तोंडून ऐकल्या वा लाऊडस्पीकर मधून मोठ्या आवाजात ऐकल्या, तरी त्यातील व्यंजनांची
ओळख तशीच कायम राहते. म्हणजे आवाजातल्या लहान-मोठेपणातही (लाऊडनेस मध्येही)
व्यंजनांची ओळख कायम राहते.
म्हणजेच मानवाला ऐकू येणार्या भाषा-ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ याच एकमेव
गुणधर्मावर व्यंजनांची ओळख अवलंबून असते.
मूलभूत-व्यंजन व मूलभूत-स्वर – कोणत्याही उच्चाराला सुरवात, शेवट आणि त्या
उच्चारात वापरला गेलेला कालवधी, म्हणजेच ध्वनीचे कालमापन, असते. उच्चारातील
सुरवातीपासून शेवटपर्यंत ज्या व्यंजनांच्या वा स्वराच्या उच्चारात मानवाला
(मानवाच्या कोणत्याही भाषेला) केवळ एकच अखंडीत ‘जातीगुणवैशिष्ट्य’ ऐकू येते त्याला
‘मूलभूत-व्यंजन’ वा ‘मूलभूत-स्वर’ असे नाव मराठीने दिले आहे.
मराठीत ‘क, ग, ङ, ट, ड, ण, च, ज, ञ, त, द, न, प, ब, म, य, र, ल, व, स, श, ष,
ह, ळ’ अशी 24 (चोवीस) ‘मूलभूत-व्यंजने’ आणि ‘अ, आ, इ, उ, ए, ओ, अॅ, ऑ’ अशी आठ ‘मूलभूत-स्वर’
व्यंजने आहेत. कोणत्याही मानवाच्या भाषेत जर ती असली तर त्याही भाषेसाठी ती
‘मूलभूत’ या व्याख्येतूनच मार्गक्रमणा करतात. हा मराठीने भाषांच्या जागतिकीकरणात
उपयोगी ठरणारा सिद्धांत मांडला आहे. याला भाषा-उच्चार-शास्त्राचा अत्याधुनिक, अचूक
व निश्चित असा दृष्टीकोन प्राप्त होतो.
संस्कृत मधे ‘चाणक्य’ शब्दात वापरले जाणारे ‘च’ चिन्हातून दर्शवले जाणारे
व्यंजन आहे. संस्कृतच्या या ‘च’ व्यंजनाचा ‘चाणक्य’ शब्दात होणारा उच्चार
‘च्यायला’ या मराठी शब्दासारखाच होतो. संस्कृतचे ‘च’ व्यंजन ‘मूलभूत-व्यंजन’ ठरत
नाही. त्याच्या सुरवातील ‘चमचा’ मधील ‘च’ असतो जो शेवटी नसतो आणि शेवटी ‘ययाती’
मधला ‘य’ असतो जो सुरवातीला नसतो. संस्कृतने स्विकारलेले व्यंजन मराठी एवढे
सुक्ष्म नाही हे संस्कृतलाही मान्य करावेच लागते. ‘सुक्ष्मतेतून भव्यतेकडे’ असे
ज्ञानेश्वरांनी केलेले वर्णन असे शास्त्रीय, अचूक व आधुनिक ठरते. जर संस्कृतचे ‘च’
व्यंजन म्हणजेच मराठीसाठीचे ‘च्य’ असे जोडाक्षर ठरते. भाषांच्या जागतिकीकरणात
‘जोडाक्षर’ या उच्चारांच्या संकल्पनेचा अचूकतेने वापर मराठीला जसा व जेवढा करता
येणार आहे तेवढा तो संस्कृतला करता येणार नाही.
संस्कृत मधील ‘ए’ हे व्यंजन संस्कृतच्या दृष्टीने ‘ए’ हा संयुक्त-स्वर आहे.
कोणत्याही मानवाने ‘ए’ स्वराचा उच्चार पाच, दहा, वीस, वा श्चास टिकेपर्यंत केल्यास
सुरवातीपासून शेवटपर्यंत केवळ एकच ध्वनी ऐकू येतो. ‘ए’ स्वराला ‘संयुक्त-स्वर’
मानून, तो ‘ए = अ+इ वा आ+इ वा अ+ई वा आ+ई’ असा
संस्कृतमध्ये वापरला जातो. त्याला संस्कृतपुरतीच अनैसर्गिक व खाजगी कारणे आहेत. मानवाच्या
नैसर्गिक स्वर-उच्चार पद्धतीशी हे धोरण विसंगत ठरते. ‘संस्कृतचे संधी नियम’ यावर
बेतलेले आहेत. भाषेतल्या ओघवतेपणात येणार्या नवीन शब्दांपासून संस्कृत भाषेचे
संरक्षण व्हावे या हेतूने पाणिनिंनी रचलेल्या व्याकरणापुरतेच ते योग्य ठरतात.
ओघवती-व्यंजने व ओघवते-स्वर – मराठीने अक्षरा बरोबरच भाषा-ध्वनीतील ‘विराम’
अचूकतेने ओळखला व भाषेतून वापरला आहे. ‘मूलभूत-व्यंजन’ उच्चारल्यानंतर स्वर
उच्चारण्याआधी जर ‘मूलभूत-व्यंजना’च्या उच्चारा लगोलग ‘ह’ व्यंजन (महाप्राण)
उच्चारला तर ‘मूलभूत-व्यंजन+महाप्राण’ यात कोणताही विराम नसलेले एकजीवीपण साकारते.
उदाहरण – ‘क+ह=ख, ग+ह=घ, ट+ह=ठ, ड+ह=ढ, च+ह=छ, ज+ह=झ, त+ह=थ, द+ह=ध, प+ह=फ, ब+ह=भ’ अशा रितीने
मराठीत ‘ख, घ, ठ, ढ, छ, झ, थ, ध, फ, भ’ अशी दहा व्यंजने साकारतात. ही दहा व्यंजने
‘क, ग, ट, ड, च, ज, त, द, प, ब’ या ‘मूलभूत-व्यंजनांच्या उच्चारानंतर ‘हवेचा
प्रवाह तसाच ओघवता ठेऊन’ त्यात ‘महाप्राण’ मिसळल्यामुळे साकारतात. यामुळे त्यांना
‘ओघवती-व्यंजने’ असे नाव आहे. या ओघवत्या-व्यंजनांना त्यानंतर स्वर जोडून भाषेतून,
बाराखडीतून, जोडाक्षरातून अशा सर्व ठिकाणी ‘मूलभूत-व्यंजनां’सारखेच वावरता येते.
त्यामुळे ती ‘क्ह, ग्हृ, ट्ह, ड्ह, च्ह, ज्ह, त्ह, द्ह, प्ह, ब्ह’ अशी जोडाक्षरे
ठरत नाहीत. ‘क, ग, ट, ड, च, ज, त, द, प, ब’ या ‘मूलभूत-व्यंजनांच्या ऐवजी जर इतर
‘मूलभूत-व्यंजना’त ‘महाप्राण’ मिसळला तर त्याचे ‘ओघवते-व्यंजन’ बनत नाही. ते
जोडाक्षर ठरते. कारण त्या व्यंजन येणारा ‘ह’ सदृष्य उच्चार ‘महाप्राण’ न ठरता ‘ह’
व्यंजन ठरते कारण त्यातील ‘ह’चा तटस्थ वेगळेपणा ऐकून जाणवतो. ‘ण्ह, न्ह, म्ह, र्ह,
ल्ह, व्ह, स्ह, श्ह, ष्ह, ळ्ह’ ही सारी जोडाक्षरे ठरतात. ‘य’ला त्यानंतर ‘ह’ जोडून
उच्चारता न येणारे जोडाक्षर बनते. मानवाला ‘य्ह’ उच्चारता येत नाही. कारण जिभेला
तेवढी चपळता मानवाला साध्य होत नाही. ‘बायको’ या शब्दातील ‘य’चा उच्चार अपूरा असला
तरी त्यात ‘अ’ स्वर असतो हे यातून सिद्ध होते. तसेच ‘गवत’ सारख्या शब्दातील शेवटचे
अक्षर जरी अपुरे उच्चारले जात असले तरी त्यात तेवढा अपुरा ‘अ’ स्वर असतो.
मराठीत ‘ऐ’ आणि ‘औ’ असे दोन स्वर आहेत. त्यांचा वापर बाराखडीतूनही होतो.
‘कैलास’ शब्दातील ‘कै’चा उच्चार ‘क+अ+इ’ असा होतो. ‘कै’चा उच्चार ‘क+आ+इ’ असा होत
नाही. ‘कौलारु’ शब्दातील ‘कौ’चा उच्चार ‘क+अ+उ’ असा होतो. ‘कौ’चा उच्चार ‘क+आ+उ’ असा होत
नाही. ‘ऐ’ आणि ‘औ’ या स्वरांचा उच्चार जर पाच, दहा, वीस, वा श्चास टिकेपर्यंत
लांबडा केल्यास त्यातील अनुक्रमे केवळ ‘इ’ व ‘उ’ स्वर ऐकू येतो. त्यात सुरवातीस
येणारा ‘अ’ स्वर लांबवता येत नाही. बाराखडीत कोणत्याही व्यंजनाला ‘ऐ’ आणि ‘औ’ स्वर
जोडून ‘कै-कौ, खै-खौ, गै-गौ, घै-घौ, . .’ असे लिहीता लिहीता व उच्चारता येतात.
यातील ‘कै, खै, गै, घै,. . .’ वा ‘कौ, खौ, गौ, घौ, . .’ यांचा उच्चार जर पाच, दहा,
वीस, वा श्चास टिकेपर्यंत लांबडा केला तर अनुक्रमे केवळ ‘इ’ व ‘उ’ स्वर ऐकू येतो
पण तरीही त्यातील मिसळलेला स्वर ‘इ’ वा ‘उ’ नसून निश्चितपणे ‘ऐ’ वा ‘औ’ आहे हे
सर्वांना कळते. ‘अ’ स्वराचा उच्चार जिभेच्या सामान्य आरामदायक स्थितीतून होतो.
त्यामुळे ‘अ’ स्वराच्या उच्चारानंतर त्यात ‘इ’ व ‘उ’ हे स्वर, जिभेच्या
चपळतेने मिसळून, त्यांच्या
संयोगातील एकजीवी अखंडता अबाधीत राखता येते.
व्यंजन व स्वर यांचे प्रत्येकी मूलभूत व ओघवते असे दोन भाग केल्याने मानवी
भाषांतील उच्चार-शास्त्रातील बर्याच गोष्टींना अचूकता प्राप्त होते.
‘उच्चार करणे’ आणि ‘ऐकू येणे’ या भाषा-ध्वनीच्या क्रियांना, नैसर्गिक
नियमांच्या अनुषंगाने, भाषेतून मार्गस्थ केल्याने अनेक गोष्टी विनासायास घडून
येतात. ‘अनुभव, आठवणी, संस्कार, विचार, भावना, बुद्धी, मन’ या भिन्न गोष्टी
असल्याचे मानव अनुभवतो. मेंदूतील यांच्या केंद्रात आदान-प्रदान, दळण-वळण व
देवाण-घेवाण होत असते. येथे जे दिले-घेतले जाते ते उर्जेतून घडते. ‘अनुभव, आठवणी,
संस्कार, विचार, भावना, बुद्धी, मन’ यांची साठवण आणि ग्रहण-प्रक्षेपण यासाठी भाषा
हेच साधन ठरते. मग भाषेतील कोणता भाग येथे उर्जा स्वरूपातून वाहतो? असा प्रश्न
पडतो. याचे उत्तर शोधताना, मानवाला त्या भाषेतील उच्चार कसा साध्य होतो याकडे
प्रथम वळावे लागते. लहानपणी ऐकलेल्या उच्चाराची नक्कल करून ते उच्चार मेंदूत
साठवतो. आपण केलेला उच्चार साठवलेल्या उच्चाराशी तंतोतंत जुळला की भाषा शिकण्याची
सुरवात होते. ‘प’ उच्चाराचा आहे की ‘ब’ हे आपण ठरवले की ‘प’ वा ‘ब’ उच्चारासाठीची
आज्ञा मेंदूतून निघते आणि स्वरयंत्र ते ओठ या उच्चारकर्त्या अवयवांना योग्य त्या
आज्ञा दिल्या जातात. या आज्ञा त्या सर्वांनी योग्यवेळेत नीट पाळल्या की एक उच्चार
करणे शक्य होते. हे सारे उच्चार करताना प्रत्येकवेळी घडते. पण त्याची आपल्याला
इतकी सवय लागते की नक्की काय व कसे घडते तेच आपल्याला कळत नाही. ‘कळते पण वळत
नाही’ अशी मराठीत म्हण आहे पण इथे मात्र ‘वळते पण कळत नाही’ असे घडते.
मानव आपापल्या भाषा शिकतो, त्या त्या भाषांचे व्याकरण लिहीले जाते, भाषा शेकडो
वर्षे वापरली जाते पण त्या भाषेची आयुष्यात एवढी सवय होते की तिच्यातील
नैसर्गिकपणा आणि अनैसर्गिकपणा कोणता ते शोधणे कठीण होते. सर्व मानवी भाषांना
‘मूलभूत-व्यंजने, ओघवती-व्यंजने, मूलभूत-स्वर, ओघवते-स्वर’ या परीस स्पर्शाने
तपासले की बर्याच गोष्टींचा उहापोह होणार आहे. मराठी भाषेने भाषांच्या
जागतिकीकरणात नैसर्गिक शास्त्रीयता देण्यासाठी तयार केलेला हा उच्च दर्जाचा
सिद्धांत ठरतो. जगाला अत्याधुनिक व शास्त्रीय भाषा-विज्ञान देऊन मराठी भाषा
भाषांच्या जागतिकीकरणात महत्त्वाची भूमिका साकार करू शकेल. ‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’
असे विभाग सर्व मानवी भाषांना लागु पडतात.
‘मूलभूत’ आणि ‘ओघवते’ हे दोन विभाग सर्व मानवी भाषांच्या व्यंजन आणि स्वरांना
लागु पडतात, असे
तुम्ही म्हणता. ते स्पष्ट कराल का?
याचे उत्तर पुढील लेखात आहे. त्यासाठीच ‘जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ या
ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मिळवा.
आपला, शुभानन
गांगल मोबाईल – 9833102727
ईमेल – gangal@gmx.com
वेबसाईट -
No comments:
Post a Comment